डहाणू ग्रामीण : वार्ताहर
डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध वारली चित्रकार राजेश लक्ष्या मोर (35) यांच्यावर संदीप अर्जुन वाडू या माथेफिरू गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने गंजाड, दोडणपाडा येथील त्यांच्या राहत्या घराजवळच धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना 24 मे रोजी घडली. या घटनेची आशागड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पद्मश्री जिव्या सोमा म्हसे यांच्या मुशीत तयार झालेल्या वारली चित्रकारांपैकी एक म्हणून राजेश मोर (रा.गंजाड, दोडणपाडा) ओळखले जातात. ते पारंपरिक वारली चित्रकलेला आधुनिकतेची जोड देऊन एक नाविन्यपूर्ण कलाकृतींचा आविष्कार घडवत आहेत. नुकतेच त्यांनी फ्रान्स येथील चित्रकला प्रदर्शनात देशाचे प्रतिनिधित्व करताना उत्तम वारली चित्रांची प्रदर्शन सादर केले. त्यांच्यावर गावातील संदीप अर्जुन वाडू याने प्राणघातक हल्ला चढवला. राजेश मोर यांनी आपल्यावरील वार वाचवण्यासाठी हात पुढे केल्याने त्यांच्या हाताला मोठी दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता आरोपी संदीपने राजेश मोर यांची पत्नी रसुला यांनाही बेदम मारहाण केली.
जखमी मोर यांना डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या हाताची जखम गंभीर असल्याने त्यांना सिल्वासा येथील विनोबा भावे सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले. आरोपी संदीप वाडूवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.