Sat, Mar 23, 2019 00:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोवंडीमध्ये ओला कॅबचालकाची हत्या

गोवंडीमध्ये ओला कॅबचालकाची हत्या

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 1:19AMमुंबई : प्रतिनिधी

गाडी धक्का लागल्याने झालेल्या वादातून तीन तरुणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत 38 वर्षीय ओला कॅब चालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री गोवंडीमध्ये घडली. सलीम गुलाम शेख असे मृत ओला कॅब चालकाचे नाव असून याप्रकरणी 24 तासांत गुन्ह्याची उकल करुन शिवाजीनगर पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतूक करत पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी पोलीस पथकाला 10 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात पत्नी आणि दोन मुलांसोबत राहात असलेला शेख हा ओला कॅब कंपनीमध्ये चालक म्हणून नोकरी करत होता. सोमवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास तो सायनमध्ये प्रवाशांना सोडून घरी परतत होता. याच मार्गाने अ‍ॅक्टीवा दुचाकीवरुन ट्रिपलसीट चालेल्या तरुणांना शेख यांच्या गाडीचा धक्का लागला. या तरुणांनी रागाच्या भरात फिल्मीस्टाईलने शेख यांच्या कॅबचा पाठलाग करत त्यांची गाडी अडवली. शेख यांना गाडीच्या बाहेर खेचून भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

तिघेही एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी शेख यांचे डोके जोराने रस्त्यावर आपटले. यामुळे गंभीर जखमी होऊन शेख हे बेशुद्ध पडले. शेख बेशुद्ध पडताच तिघांंनीही तेथून पळ काढला. याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, शेख यांना उपचारांसाठी तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र शेख यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

पोलीस उपायुक्त शहाजी उमाप आणि सहायक पोलीस आयुक्त दिनेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिपक पगारे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक हुसेन जतकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष नरुटे आणि पोलीस उपनिरीक्षक ओमसिद्ध ओलेकर यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला.