होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धक्कादायक; लंगडा म्हणून चिडवल्याने केली हत्या

धक्कादायक; लंगडा म्हणून चिडवल्याने केली हत्या

Published On: Jan 16 2018 2:13AM | Last Updated: Jan 16 2018 2:13AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

लंगडा म्हणून चिडवत असल्याच्या रागातून एका तरुणाने 55 वर्षीय व्यक्तीची चाकूने भोकसून निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री अंधेरीमध्ये घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करत साकिनाका पोलिसांनी आरोपी मोहम्मद इक्बाल रफीक शेख याला बेड्या ठोकल्या आहेत.

अंधेरी पुर्वेकडील साकिनाका, 90 फुटी रोड परिसरात असलेल्या नवजीवन इमारतीमध्ये अब्दुल मुनाफ मोमीन हा कुटूंबासोबत राहात होता. व्यवसायाने इलेक्ट्रीशीयन असलेल्या मोमीन याचा याच परिसरात राहात असलेल्या आरोपी शेख याच्यासोबत दोन वर्षांपूर्वी किरकोळ कारणावरुन वाद झाला. वादानंतर एका पायाने अपंग असलेल्या शेख याला मोमीन लंगडा म्हणून चिडवू लागला. याचाच राग शेखच्या मनात होता. रविवारी रात्री यावरुनच दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि रागाच्या भरात शेेख याने सोबत आणलेल्या चाकूने सपासप वार करुन पळ काढला. हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या साकिनाका पोलिसांनी जखमी अवस्थेतील मोमीन याला उपचारासाठी तात्काळ जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

मोमीन याची पत्नी शाहिदाबानू हिच्या तक्रारीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने हल्लेखोर आरोपी शेख याचा शोध सुरू केला. रात्री उशिरा त्याला याच परिसरातून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.