Sat, Sep 22, 2018 20:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कौटुंबिक वादातून अल्पवयीन  पुतण्याकडून काकाची हत्या 

कौटुंबिक वादातून अल्पवयीन  पुतण्याकडून काकाची हत्या 

Published On: Jun 20 2018 2:01AM | Last Updated: Jun 20 2018 1:19AMभिवंडी :  वार्ताहर 

भिवंडी शहरातील बजरंग नगर परिसरात अल्पवयीन पुतण्याने कौटुंबिक वादातून आपल्या सख्या काकाची धारदार शस्त्राने हत्या केली. बाबूशा शिंदे (28) असे मृत काकाचे नाव असून आरोपी हत्या करून फरार झाला आहे. या घटनेने भिवंडी परिसरात एकच खळबळ माजली आहे.

शहरातील बजरंग नगर येथे बाबुशा आणि आरोपीचे वडील एकाच घरात राहत होते. येथील बाबुशा यांच्या ताब्यातील खोलीमधील भाडोत्री काढून खोली आपल्या मुलांना द्यावी, यावरून आरोपीच्या वडिलांचे आठवडाभरापासून आपल्या भावासोबत वाद सुरू होता. 

सोमवारी दोन्ही भावडांमध्ये झालेल्या वादात आरोपीच्या वडिलांचा हात दुखावला होता. याचा राग मनात धरून आरोपीने मंगळवारी रात्री 8.30 च्या सुमारास काका बाबुशा यांच्या घरात घुसून वडिलांना मारहाण केल्याचा जाब विचारत भांडण केले.  त्यानंतर आपल्याकडील चॉपरने काकाच्या पोटात वार केले. अधिक रक्तस्त्राव झाल्याने बाबुशा जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच  नारपोली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात पाठवला. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी पुतण्याविरोधात गुन्हा दाखल केला.