Mon, Aug 19, 2019 17:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील पालिका शाळांचे वाजले तीनतेरा !

मुंबईतील पालिका शाळांचे वाजले तीनतेरा !

Published On: Dec 13 2017 2:37AM | Last Updated: Dec 13 2017 2:35AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

मुंबई महापालिकेतील शाळांमधील शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत. प्रति विद्यार्थ्यामागे दरवर्षी 52 हजार 142 रुपये खर्च केले जात असतानाही गेल्या चार वर्षांत 90 हजार विद्यार्थ्यांमध्ये गळती झाल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे पालिका शाळेतील शिक्षणाचा घसरणारा दर्जा व विद्यार्थ्यांच्या होणार्‍या गळतीबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा प्रजा संस्थेचा शैक्षणिक अहवाल मंगळवारी एका पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. या अहवालातील आकडेवारीनुसार मुंबई मनपा शाळांतील पहिलीच्या वर्गात 2008-09 मध्ये 63 हजार 392 विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र 2016-17 पर्यंत यात सुमारे 50 टक्के घट होऊन ही संख्या 32 हजार 218 पर्यंत खालावली आहे. महापालिका शाळांतील एकूण विद्यार्थी संख्येतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 2012-13 मध्ये महापालिका शाळांत 4 लाख 34 हजार 523 विद्यार्थी शिकत होते. मात्र 2016-17 पर्यंत म्हणजेच अवघ्या 4 वर्षात 90 हजार 902 विद्यार्थ्यांची घट झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 43 हजार 621 पर्यंत खाली आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

या अहवालानुसार 2015-16 ते 2016-17 या शैक्षणिक वर्षांत विद्यार्थीगळतीचे प्रमाण तब्बल 10 टक्के होते. ही फारच चिंताजनक बाब असून अशीच स्थिती राहिल्यास येत्या काही वर्षांत प्रशासनाला महापालिका शाळा बंद कराव्या लागतील, अशी भीतीही यावेळी प्रजा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष नीताई मेहता यांनी व्यक्त केली. 

निकाल टक्का घसरला

पालिका शाळांची विद्यार्थी संख्या घटत असताना निकालाचा टक्काही घसरल्याचे दिसत आहे. पालिका शाळेचा 2016 मध्ये दहावीचा निकाल 76.97 टक्के लागला होता. तर मार्च 2017 मध्ये झालेल्या दहावीचया परीक्षेत महापालिका शाळांचा निकाल 68.91 पर्यंत खालावला.  

नगरसेवकही थंड

पालिका शाळेतील विद्यार्थी संख्या दरवर्षी घसरत असताना, नगरसेवकांनी मात्र मौन बाळगले आहे. पालिकेतील 232 नगरसेवकांपैकी 167 नगरसेवकांनी शाळांच्या दर्जाबद्दल एकही प्रश्न विचारलेला नाही. नगरसेवकांनी शिक्षणावर आधारित केवळ वर्षभरात 183 प्रश्न उपस्थित केले असल्याचे उघड झाले आहे.