होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते

शिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते

Published On: Jul 23 2019 1:27AM | Last Updated: Jul 23 2019 1:36AM
मुंबई : प्रतिनिधी 

क्रॉफर्ड मार्केट परिसरातील महापालिकेची छत्रपती शिवाजी मंडईची इमारत धोकादायक असल्याने येथील मासळी विक्रेत्यांना पालिकेने थेट ऐरोली नाका येथे जाण्याचे फर्मान नोटिसद्वारे काढले आहे. कोळी महिलांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार असून त्यानंतर त्यांना क्रॉफर्ड मार्केट परिसरातच जागा दिली जाईल, असे आश्वासन पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले.

कोळी महिलांनी गुरूवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली.  यावेळी पालिकेकडून कितीही नोटीस येऊ दे, तुम्ही अजिबात हलायचे नाही, असा सल्ला देत यावर तोडगा काढण्यासाठी पालिका आयुक्तांची भेट घेऊ असे आश्वासन ठाकरे कोळी बांधवांना दिले होते. सोमवारी राज ठाकरे यांनी आयुक्तांची भेट घेऊन कोळी महिलांचा प्रश्न मांडला. यावेळी मनसेचे अरविंद गावडे व अन्य पदाधिकारी व कोळी महिला विक्रेते उपस्थित होते. 

कोळी महिलांचे मुंबईतच पुनर्वसन करून, त्यांना पुन्हा पुनर्विकास करण्यात येणा-या मंडईत आणावे, अशी मागणी ठाकरे यांनी  केली. कोळी महिला वर्षानुवर्षे घाऊक मच्छीविक्रेत्यांकडून, तर कधी ससून गोदी कुलाबा आणि कसारा गोदी, भाऊचा धक्का येथून मासळी विकत घेतात आणि किरकोळ पद्धतीने छत्रपती शिवाजी मंडईत विक्री करतात. 

ऐरोली नाका मुंबईपासून सुमारे 20 ते 25 किलोमीटर लांब आहे. तेथे जाणे सामान्य कोळी महिलांना शक्य नसल्याचेही राज यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणले. यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शिवाजी मंडईतील कोळी महिला विक्रेत्यांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे. मंडईचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी आणले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.