Tue, Nov 20, 2018 18:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जागतिक अपंग दिनी अपंग व्यक्तिने केली हवाई सफारी (व्हिडिओ)

जागतिक अपंग दिनी अपंग व्यक्तिने केली हवाई सफारी (व्हिडिओ)

Published On: Dec 03 2017 6:15PM | Last Updated: Dec 03 2017 6:25PM

बुकमार्क करा

ठाणे : अमोल कदम

ऊंच आकाशी झेप घेऊन, मुक्त विहार करण्याचे स्वप्न सर्वांचेच असते, मात्र ते काही मोजक्या भाग्यवान लोकांचेच पूर्ण होते, अपंगत्वावर मात करीत थेट राष्ट्रीय शिवशाहीर अशी ख्याती मिळविलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील डॉ. विजय तनपुरे यांचे आज अपंग दिनी ते ऊंच आकाशातून पृथ्वी पाहण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे, आकाशात भ्रमंती करताना त्यांनी अपंग नव्हे अभंग म्हणत अनोखा आनंद लुटीत अपंग बांधवांना प्रेरणा दिली. 

पॅरामोटर या हवेतील साहसी खेळात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवुन दिलेले तसेच राज्य शासनाचा शिव छत्रपती हा प्रतिष्ठेचा पुरस्कार विजेते देवळाली-प्रवरा येथील सुपूत्र अप्पासाहेब ढूस यांनी आज जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधित सामाजिक दायित्वाच्या भावनेतून डॉ. विजय तनपुरे यांना आपल्या सोबत पॅरा मोटारच्या साहाय्याने जमिनीपासून सुमारे १ हजार फूट उंचीवर नेऊन ११ किलोमीटर अंतराची हवाई सफर घडवून आणून अनोख्या पद्धतीने जागतिक अपंग दिन साजरा केला, पूर्व परवानगी शिवाय १ हजार फुटांपेक्षा जास्त ऊंच जाता येत नाही, म्हणून उंचीवर जाण्याचे बंधन होते, राहुरी औद्योगिक वसाहत येथून उड्डाण घेऊन मुळा धरण, जोगेश्वरी आखाडा, कनगर, राहुरी या भागात हवाई विहार करताना डॉ. तनपुरे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता, 

शरीराने अपंग असले तरी मनाने खंबीर रहा आपलं काय गेलंय यापेक्षा आपल्याकडे काय शिल्लक आहे याचा विचार करा, जिद्द आणि चिकाटीने संकटांवर मात करुन आपण यशाच्या शिखरावर जाऊ शकतो असा संदेशही डॉ, तनपुरे आणि अप्पासाहेब ढूस यांनी या निमित्ताने तरुणांना दिला आहे.