Fri, Apr 19, 2019 12:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'कमला मिलच्या कारवाईत कोणाचा दबाव?'

'कमला मिलच्या कारवाईत कोणाचा दबाव?'

Published On: Jan 07 2018 4:41PM | Last Updated: Jan 07 2018 4:40PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कमला मिल मधील हॉटेलवरील कारवाईत एका राजकीय नेत्यांने दबाव आणल्याचा गौप्यस्फोट महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केला. एवढेच नाही तर ते नाव विरोधी पक्षनेत्यांनी शोधावे, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या कॉग्रेसवर आरोप केला. आयुक्तांनी सोपवलेली ही जबाबदारी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्विकारली आहे. दबाव टाकणाऱ्या नेत्याचे नाव शोधू पण यासाठी आयुक्तांनी पूर्णपणे सहकार्य करावे,असे सांगत आयुक्तांना अडचणीत आणले आहे. 

कमला मिलमधील मोझो आणि वन अबाव्ह या पबमधील आगीसंदर्भात महापालिका सभागृहात चर्चा उपस्थित करताना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आयुक्तांवर या कारवाईत दबाव टाकणारी ती व्यक्ती कोण असा सवाल आयुक्तांना विचारला होता. त्यावर आयुक्तांनी, कमला मिलमधील आगीनंतर सहा अधिकाऱ्यांना निलंबित केले. हे निलंबन केले जात असताना एका राजकीय नेत्याने अशी कशी कारवाई केली, अशी विचारणा केली. परंतु त्या नेत्याच्या हॉटेलसह १७ हॉटेल,पबमध्येही कारवाई करण्यात आली. त्या राजकीय नेत्याचे नाव मी सांगणार नाही. ते नाव विरोधी पक्षनेत्याने शोधावे असे सांगितले. आयुक्तांच्या या निवेदनानंतर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी यावर स्पष्टीकरण देताना महापालिका आयुक्त माझे  बॉस नाहीत, त्यामुळे मला ते अशाप्रकारच्या सूचना करू शकत नाही. परंतु या दबाव टाकणाऱ्या राजकीय नेत्याचे नाव मी शोधावे अशी त्यांची इच्छा असेल तर मी त्यासाठी तयार आहे. 

दबाव टाकणाऱ्या राजकीय नेत्याच्या नाव शोधण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली जर सत्यशोधन समिती तयार करण्याची आयुक्तांची इच्छा असेल तर त्यांनी महापौरांच्या माध्यमातून  माझे नाव जाहीर करावे. परंतु ही चौकशी करण्यासाठी आयुक्तांनी मला पूर्ण सहकार्य करावं. २९ ते ३१ जानेवारी दरम्यान आयुक्तांना कुणा कुणाचे फोन आले होते, त्या फोन कॉल्सची विस्तृत माहिती त्यांनी मला उपलब्ध करून द्यावी. याशिवाय या कालावधीत कोण कोण आयुक्तांना भेटायला आले होते, याचीही माहिती उपलब्ध करून द्यावी,अशी मागणीही रवी राजा यांनी केली आहे. त्यामुळे आयुक्तच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.