Sat, Jun 06, 2020 05:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माझ्या आग्रहामुळे झाले बॉम्बेचे मुंबई  : राम नाईक

माझ्या आग्रहामुळे झाले बॉम्बेचे मुंबई  : राम नाईक

Published On: Jun 02 2018 2:02AM | Last Updated: Jun 02 2018 1:40AMठाणे : खास प्रतिनिधी 

उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील सांस्कृतिक देवाण-घेवाणीचा करार करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिन मोठ्या थाट्यात उत्तर प्रदेशातील राजभवनात साजरा होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार पुढील वर्षी 24 जानेवारीला सरकारतर्फे मुंबईत साजरा होणार्‍या उत्तर प्रदेश दिनाची राज्यपाल या नात्याने अतुरतेने वाट पाहत असल्याची भावना उत्तर प्रदेशाचे राज्यपाल राम नाईक यांनी आज ठाण्यात व्यक्त केली. माझ्या आग्रहामुळे  बॉम्बेचे मुंबई झाले असून केंद्रीय गृहराज्यमंत्री असताना 28 मे 1999 रोजी हिंदीत मुम्बई नव्हे मुंबई लिहिले पाहिजे, असा निर्णय घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

राम नाईक हे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सोहळ्यासाठी ठाण्यात आले होेते. कार्यक्रमापूर्वी त्यांनी काही पत्रकारांशी अनौपचारीक संवाद साधला. उत्तर प्रदेशात मोठ्याप्रमाणात सातारा, सांगलीसह राज्यातील मराठी माणसे राहतात. प्रामुख्याने सोने-चांदी गाळण्याच्या व्यवसायात ते अधिक आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशाच्या राजभवनात एक आणि 2 मेरोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यास मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यावर्षी दुसर्‍यांदा राजभवनात महाराष्ट्र दिन साजरा झाला. यावेळेसह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे सहभागी होते. 

राज्यपालाच्या 3 वर्ष 10 महिन्यांच्या कालावधीत 1410 दिवसांमध्ये 24 हजार 67 लोकांना राजभवनात भेटलो. कुठलाही राज्यपाल वार्षिक अहवाल प्रसिद्ध करीत नाही. मात्र राज्यपाल म्हणून केलेल्या कामाचे दरवर्षी अहवाल प्रसिद्ध करतो, असे त्यांनी सांगितले. हा रामभाऊ म्हाळगी यांचा प्रभाव असल्याचे  ते म्हणाले. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते मिळवणारच ही अमर घोषणा लोकमान्य टिळकांनी 1916 मध्ये लखनौ कॉगे्रस अधिवेशनात भाषण करताना केली. त्या भाषणाच्या 101 व्या वर्षी निमित्ताने माझ्या पुढाकाराने एक भव्य कार्यक्रम केल्याची माहीती त्यांनी दिली.

मुंबईतली छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील लावलेल्या महाराजांच्या तैलचित्रांवरील चुकीचे जन्मवर्ष माझ्यामुळे बदलण्यात आले आहे. तसेच छत्रपती शाहू महाराजांची जयंती देखील उत्तरप्रदेशात 26 जुलैला साजरी केली जात होती. ती चुकीची तारीखही बदलून आता 26 जून रोजी साजरी केली जात आहे, असे त्यांनी सांगितले. यावेेळी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, अरूण करमरकर आदी मान्यवर उपस्थित होते.