Wed, May 22, 2019 22:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई विद्यापीठात निवडणुकांचे पडघम

मुंबई विद्यापीठात निवडणुकांचे पडघम

Published On: Dec 02 2017 1:30AM | Last Updated: Dec 02 2017 12:53AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

निकाल गोंधळाने रखडलेल्या निवडणुका आता विद्यापीठात होत आहेत. मुंबई विद्यापीठाने अधिसभेच्या व अभ्यास मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली असून याची अधिसूचना शनिवारी (उद्या)प्रसिद्ध केली जाणार आहे.

अधिसभेवर निवडून जाणार्‍या प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्यापीठ अध्यापक आशा तीन घटकांच्या व अभ्यास मंडळासाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख या घटकाच्या निवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपातील मतदार यादी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाणार आहे. तसेच ती यादी अवलोकनार्थ मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कार्यालयातही उपलब्ध केली जाणार आहे. या मतदार यादीत आक्षेप असल्यास त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक कुलसचिव यांच्याकडे 6 डिसेंबर 2017 पर्यंत नमुना ए नुसार सादर करावेत असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

अधिसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्यापीठ अध्यापक व अभ्यास मंडळासाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख अशा चार घटकांच्या  प्रतिनिधींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत तर दुसर्‍या टप्प्यात शिक्षक व  नोंदणीकृत पदवीधर घटकांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात अधिसभेवर जाण्यासाठी 19 जागा व अभ्यास मंडळावर जाण्यासाठी 3 अशा एकूण 22 जागा असतील.