होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अनधिकृत बांधकामाने केला घात

अनधिकृत बांधकामाने केला घात

Published On: Dec 30 2017 1:46AM | Last Updated: Dec 30 2017 1:29AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

कमला मिलमधील वन अबाव्ह या पबमधील अनधिकृत बांधकामाने 14 जणांचा जीव घेतला आहे. या पबने मोकळ्या जागेचा अनधिकृत वापर केला होता. त्यामुळे पालिकेने बांधकाम हटवण्यासाठी नोटीस बजावली होती; पण पबने या नोटीसकडे दुर्लक्ष केल्यामुळे पालिकेने मे महिन्यात हे बांधकाम जमीनदोस्त केले. पण पालिकेची पाठ फिरताच पुन्हा अनधिकृत बांधकाम  उभारण्यात आले. 

वन अबाव्ह या पबमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याच्या शेकडो तक्रारी आल्या होत्या. येथील अनधिकृत बांधकामाची विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी इमारत प्रस्ताव विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला पत्र लिहून माहिती मागवली होती; पण या  अभियंत्याने कमला मिलमध्ये अनधिकृत बांधकाम न झाल्याचे अहवाल दिला होता. 

एवढेच नाही तर मिलमधील बांधकाम करण्यात आलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रही दिल्याचे सांगिण्यात आले. पण प्रत्यक्षात येथे अनधिकृत बांधकाम झाल्याचे माहितीच्या अधिकाराखाली उघड झाले होते. त्यामुळे येथील अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी जी-दक्षिण विभागाने नोटीस बजावून बांधकामही जमीनदोस्त केले. 

दरम्यान वन अबाव्ह या पबकडे हॉटेलचा परवाना आहे; परंतु आग लागली त्या मोकळ्या जागेचा ते अनधिकृत वापर करत होते. त्यामुळे 27 मे 2017 मध्ये  या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर या जागेचा वापर त्यांच्याकडून सुरू होता. त्यामुळे 4 ऑगस्ट, 22 सप्टेंबर व 27 ऑक्टोबरमध्ये नोटीस देऊन या मोकळ्या जागेचा वापर बंद करण्यात यावा , असे कळवण्यात आला होते; असे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी स्पष्ट केले. कमला मिलमधील वन अबाव्ह या क्लबमधील आगीच्या दुर्घटनेनंतर या भागातील सर्वच कार्यालयांची तपासणी करण्यात येईल. यामध्ये ज्यांचे अनधिकृत आणि वाढीव तसेच नियमबाह्य बांधकाम झाल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही सपकाळे यांनी सांगितले.