Fri, Nov 16, 2018 01:17



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरीतील चायना गेट, टॅप रेस्टॉरंटचे अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त 

अंधेरीतील चायना गेट, टॅप रेस्टॉरंटचे अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त 

Published On: Jan 07 2018 4:03PM | Last Updated: Jan 07 2018 4:03PM

बुकमार्क करा




मुंबई  : प्रतिनिधी 

अंधेरी पश्चिम येथील न्यू लिंक रोड वरील चायना गेट रेस्टॉरंट व टॅप रेस्टॉरंट मधील २ हजार चौरस फुटांपेक्षा मोठे अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त करण्यात आले. या कारवाईमुळे हॉटेल व्यवसायिक चांगलेच हादरले आहेत.

 अंधेरी पश्चिम परिसरात असणार्‍या न्यू लिंक रोड वरील रॉयल प्लाझा को ऑपरेटिव्ह सोसायटी मधील तळ मजल्यावर असणाऱ्या टॅप रेस्टॉरंट च्या मागील व पुढील बाजूस अनधिकृत शेड उभारून त्याचा 'डायनिंग एरिया'सारखा वापर केला जात होता. तर याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या चायना गेट रेस्टॉरंट मध्ये देखील अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. याबाबत या दोन्ही उपहारगृहांना मुंबई महापालिका अधिनियम ३५१ नुसार यापूर्वीच नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही उपहारगृहातील अनधिकृत बांधकाम  तोडण्यात आल्याचे के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. 

वांद्रे पश्चिम,सांताक्रुझ पश्चिम व खार पश्चिम परिसरात असणाऱ्या अनेक मोठ्या हॉटेल्समधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेद्वारे धडक कारवाई करण्यात येऊन या उपहारगृहांमधील अनधिकृत बांधकाम तोडण्यात येत आहे. गेल्या साधारणपणे २ दिवसांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत वांद्रे पश्चिम परिसरातील 'लगुना बार' चे २ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे. तर याच परिसरातील 'कॅफे बांद्रा' येथील ६०० चौरस फुटांचे बांधकाम  तोडण्यात आल्याचे एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी सांगितले. लगुना बार चे अनधिकृत बांधकाम दोनच महिन्यांपूर्वी नोव्हेंबर २०१७ मध्ये तोडण्यात आले होते. मात्र संबंधितांनी या ठिकाणी पुन्हा अनधिकृत बांधकाम केले होते. याबाबत संबंधितांद्वारे कोर्टात आणि महापालिकेच्या इमारत प्रस्ताव खात्याकडे दावा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यांचा दावा फेटाळण्यात आला. त्यामुळे या बांधकामावर महापालिकेने पुन्हा कारवाई केल्याचे उघडे यांनी सांगितले.