Sat, Jul 20, 2019 12:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'त्या' बँक अधिकाऱ्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा : अशोक चव्हाण

'त्या' बँक अधिकाऱ्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा : अशोक चव्हाण

Published On: Jun 23 2018 4:41PM | Last Updated: Jun 23 2018 4:41PMमुंबई : प्रतिनिधी

पीक कर्जासाठी बँक अधिकाऱ्यांने शेतकऱ्याच्या  पत्नीकडे शरीर सुखाची मागणी करण्याची घटना संतापजनक व क्लेशदायक आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात, अशी मागणी होणं हे भाजपा सरकारचं अपयश आहे. या प्रकरणात नुसता गुन्हा दाखल करून चालणार नाही, तर त्या बँक अधिकाऱ्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात पीक कर्जासाठी आपल्या पत्नीसह बँकेत गेलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीकडे, तेथील बँक मॅनेजरने शरीर सुखाची मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. शेतकऱ्यांना आणखी किती अन्याय भाजपा सरकारच्या काळात सहन करावा लागणार असा  प्रश्न काँग्रेसने केला आहे.

शेतकऱ्यांना राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळत नाही, पीक विम्याचे पैसे वेळेवर दिले जात नाहीत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. या परिस्थितीत सरकार आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहून मदत करण्याची गरज आहे. पण मदत करणे सोडा पण शेतकरी कुटुंबियांना अपमानित करणाऱ्या घटना राज्यात घडू लागल्या आहेत, त्याचा निषेध करावा तितका कमीच असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.