Fri, Apr 19, 2019 08:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई, ठाणेकरांवरील टोलभार मात्र कायम!

मुंबई, ठाणेकरांवरील टोलभार मात्र कायम!

Published On: Dec 16 2017 1:45AM | Last Updated: Dec 16 2017 1:30AM

बुकमार्क करा

नागपूर : दिलीप सपाटे 

30 हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या 10 हजार कि.मी लांबीच्या राज्य महामार्गांवर कोणताही टोल आकारला जाणार नाही. सर्व वाहनांना टोलमाफी असेल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. मात्र, मुंबईच्या  प्रवेशद्वारावरील  टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा प्रस्ताव आर्थिकदृष्ट्या सरकारला परवडणारा नसल्याने तेथे टोल कायम रहाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने मुंबई आणि ठाणेकरांवरील टोलचा भार कायम राहणार हे स्पष्ट झाले आहे. ‘उत्कर्ष महामार्ग’अंतर्गत राज्यातील 10 हजार किमीच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी हायब्रीड अ‍ॅन्युइटी मॉडेलला मान्यता दिली आहे. या कामांवर 30 हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. किमान पन्नास ते शंभर किमी रस्त्याचा एक प्रकल्प अशा सुमारे दीडशेहून अधिक प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे. त्यासाठी दक्षिण कोरिया, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, हाँगकाँग, इंग्लंड आदी सात देशांतून आणि 18 राज्यांतील कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे.

 विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षाचे नेतेअजित पवार यांनी भाजपने निवडणुकीपूर्वी टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्‍वासन दिले होते. त्याचे काय झाले? की हे आश्‍वासन विसरले का? असा सवाल केला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी टोलमुक्त महाराष्ट्राची आमची भूमिका कायम आहे.  उत्कर्ष महामार्ग योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणार्‍या 10 हजार किमी लांबीच्या रस्त्यांवर कोणताही टोल नसेल. 

दरम्यान राज्यात टोलमुक्ती साकार होत असतांना मुंबईच्या पाच प्रवेशद्वारावर हलक्या वहानांना कधी टोलमाफी देणार, असा सवाल, भाजपचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केला. मुंबईच्या प्रवेशव्दारावरही हलक्या वाहनांना टोलमाफी मिळावी ही सरकारची भूमिका असली तरी त्यासाठी सरकारवर मोठा आर्थिक भार पडणार आहे. याआधी राज्यातील अन्य टोल नाक्यावर हलक्या वाहनाना टोलमधून सवलत देण्यासाठी सरकारवर 400 कोटींचा बोजा पडला. तो सहन करण्यासारखा होता. मुंबईच्या प्रवेशव्दारावरील टोलमाफीचा भार न पेलवणारा असल्याने वित्त विभागाकडे पाठविण्यात आल्याचे पाटील म्हणाले.