Fri, Jul 10, 2020 22:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बलात्कार प्रकरणांत महाराष्‍ट्राचा तिसरा क्रमांक

बलात्कार प्रकरणांत महाराष्‍ट्राचा तिसरा क्रमांक

Published On: Dec 02 2017 1:29AM | Last Updated: Dec 02 2017 1:29AM

बुकमार्क करा

मुंबई : अवधूत खराडे

कोपर्डीतील छकुलीवर पाशवी बलात्कार करत तिची निर्घृण हत्या करणार्‍या त्या तीन नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असली तरी गेल्यावर्षी 4 हजार 189 जणी वासनेच्या बळी ठरल्या असून बलात्काराच्या गुन्ह्यात राज्य देशात तिसर्‍या क्रमांकावर पोहचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील महिला, तरुणी आणि लहान मुली अशा 712 जणींचा यात समावेश असल्याने वासनांधांच्या नजरेतून महाराष्ट्रातील मुली कशा सुटणार असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

राज्यातील महिला, मुली आणि तरुणींना सुरक्षेची भावना निर्माण करुन देण्यासाठी शासन आणि पोलीस प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. परंतु या उपक्रमांचा कितपत फायदा होतो हा एक यक्ष प्रश्‍न बनला आहे. राज्यातील महिलांवर अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून गेल्यावर्षात 4 हजार 189 जणी वासनेच्या बळी ठरल्या. यात अनोळखी व्यक्तींकडून करण्यात आलेल्या बलात्कार करणार्‍यांची संख्या सर्वाधिक म्हणजे 4 हजार 126 आहे.

वडील, आजोबा, भाऊ आणि मुलगा अशा रक्ताच्या नात्यांतील व्यक्तींनी 96 जणींवर, जवळच्या नातेवाइकांनी 111 जणींवर बलात्कार आणि लैंगिक शोषण करुन आपल्या वासनेची भूक भागविल्याचेही धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दूरच्या नातेवाइकांनी केलेल्या दुष्कर्माचा आकडाही 151 वर पोहचला असून वाईट नजर ठेवून असलेल्या शेजार्‍यांच्या वासनेच्या 683 जणी बळी पडल्या आहेत. कामाच्या ठिकाणी सहकर्मचार्‍यांनी 56 नोकरदार तरुणींवर बलात्कार केले असून 38 जणींना लिव्ह अ‍ॅन्ड रिलेशन शिपमध्ये ठेवून नराधमांनी आपल्या वासनेची भूक भागवून त्यांना वार्‍यावर  सोडले आहे. लग्नाचे आमिष दाखवत 1 हजार 422 जणींशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले, तर 1 हजार 569 जणींशी असलेल्या घट्ट मैत्री किंवा ओळखीचा फायदा उठवून बलात्कार करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी मुंबई यात आघाडीवर असून 2015 सालात 447 अल्पवयीन मुली आणि 263 तरुणी व महिला वासनेच्या बळी ठरल्या होत्या. हा आकडा गेल्यावर्षी दोनने वाढून 455 अल्पवयीन मुली आणि 257 तरुणी व महिलांवर बलात्कार झाल्याचे गुन्हे दाखल झाले. यातील अवघ्या 632 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. नराधमांना कठोर शिक्षा होत नसल्याने असे गुन्हे करणार्‍यांचे धाडस वाढत असल्यानेच बलात्काराच्या गुन्ह्यात राज्य देशात तिसर्‍या क्रमांकावर आहे.