Thu, Apr 25, 2019 14:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एकच निविदा आल्याने काम ‘शापूरजी पालनजी’ला मिळणार?

एकच निविदा आल्याने काम ‘शापूरजी पालनजी’ला मिळणार?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

दुसर्‍यांदा निविदा मागवूनदेखील पुन्हा फक्त शापूरजी पालनजी कंपनीचीच निविदा आल्याने इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उभारणीचे काम याच कंपनीला दिले जाण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मात्र यंदाच्या महापरिनिर्वाणदिनाचाही मुहूर्त हुकण्याची शक्यता लक्षात घेत सरकारला या स्मारकाची आठवण करून देणारा सामाजिक समता मंच प्रणित आठवण मोर्चा येत्या मंगळवारी  मुंबईत धडकणार आहे .

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाटकोपर येथील जाहीर सभेत इंदू मिलची संपूर्ण जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी देण्याचे जाहीर केले. दि. 11 ऑक्टोबर 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. जागा हस्तांतरण झाल्याचा लोकसभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सर्व अडचणी दूर करून भूमिपूजन झाल्यानंतर जवळ जवळ दोन वर्षाचा कालावधी उलटला तरीसुद्धा इंदू मिलच्या जागेवर उभ्या राहणार्‍या बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाबद्दल कोणतीच प्रगती दृष्टिपथात दिसत नाही. त्यामुळे  महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनतेपुढे मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
6 डिसेंबरपासून कामाचे नियोजनस्मारकाच्या कामाला 6 डिसेेंबरपासून प्रत्यक्ष सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. यापूर्वीही स्मारकाच्या बांधकामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यावेळीही शापूरजी पालनजी कंपनीनेच निविदा सादर केली होती. 

या कामासाठी आम्हाला कंपन्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नही. यापूर्वी एकच निविदा सादर झाल्यामुळे पुन्हा निविदा मागविण्याचा निर्णय आम्ही घेतला. मात्र दुसर्‍यावेळीही एकच निविदा सादर झाली आहे. त्यामुळे दोन्ही वेळी निविदा सादर करणार्‍या शापूरजी पालनजी कंपनीला आम्ही हे काम देऊ शकतो, असे एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीत या प्रकल्पासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ती डेडलाईन     एमएमआरडीएला पाळता आलेली नाही. आता किमान 6 डिसेंबरला वर्क ऑर्डर देण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.  या प्रकल्पाची अंदाजित किंमत किती आहे, याची नेमकी माहिती मिळालेली नाही. पहिल्यांदा निविदा मागविण्यात आल्या त्यावेळी या स्मारकाच्या बांधकामाची अंदाजित किंमत 550 कोटी रुपये होती, दुसर्‍या वेळी ती 622 कोटींपलिकडे गेली आहे. 

दादरमधील इंदू मिलच्या 12 एकर जागेवर हे भव्य स्मारक उभारले जाणार असून, शशी प्रभू आणि असोसिएट्स या ख्यातनाम स्थापत्यतज्ज्ञ कंपनीने त्याचा आराखडा तयार केला आहे. अशा प्रकारच्या कामाला पुर्वानुभव नसल्यामुळे निविदा प्रक्रियेला कमी प्रतिसाद मिळाला असावा. या स्मारकाच्या कामासाठी कठोर डेडलाईन देण्यात आली आहे. कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. निविदापूर्व बैठकीसाठी 12 कंत्राटदारांनी उपस्थिती दर्शविली होती, अशी माहिती शशी प्रभू यांनी दिली.