Sun, Aug 25, 2019 03:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रस्त्यांवरचे दिवे आता एलईडीवर : मुख्यमंत्री

रस्त्यांवरचे दिवे आता एलईडीवर : मुख्यमंत्री

Published On: Feb 14 2018 4:07PM | Last Updated: Feb 14 2018 4:07PMमुंबई : प्रतिनिधी

उर्जा बचतीसाठी राज्यातील सर्व महानगरपालीका,नगरपालीका व नगरपरीषदांच्या कार्यक्षेत्रातील पथदिवे  एलईडीवर आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांवरचे जुने पारंपरिक दिवे बदलून नवीन एलईडी दिवे लावण्यासाठी एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ( ईईएसएल) व नगरविकास विभाग यांच्यात बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. यावेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नगरविकास विभागाच्या प्रधानसचिव मनिषा म्हैसकर ,ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभकुमार उपस्थित होते.

या सामंजस्य करारानुसार ईईएसएलच्या स्ट्रीट लाईटिंग नॅशनल प्रोग्रॅम अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सुमारे २० लाख एलईडी दिवे लावले जातील . यामधुन 500 मेगावॅट वीज बचत होणार असुन, वीज बिलात किमान 50 टक्कयांनी घट होणार आहे.

नगरविकास खात्याच्या अखत्यारीतील सुमारे ३९४ शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना टप्प्या-टप्याने या योजनेचा लाभ मिळेल. या प्रकल्पा अंतर्गत सध्याचे सोडियम व्हेपर, मर्क्युरी व्हेपर दिवे बदलून तिथे एलईडी दिवे लावले जातील. तसेच या दिव्यांची पुढील सात वर्षे देखभाल केली जाईल. या योजनेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद,नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि नांदेड यासारखी प्रमुख शहरे समाविष्ट असतील.