Tue, Mar 26, 2019 01:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धक्कादायक; गर्भवती पत्नीने घर सोडल्याने नवर्‍याची आत्महत्या

गर्भवती पत्नीने घर सोडल्याने नवर्‍याची आत्महत्या

Published On: Mar 17 2018 11:01AM | Last Updated: Mar 17 2018 11:01AMविरार: वार्ताहर

बायकोने घर सोडल्याच्या कारणावरून तिच्या नवर्‍याने लोकल खाली उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये बुधवारी दुपारी उघडकीस आला. अमित पोकर (25) असे मृत तरुणाचे नाव आहे. अमितने आत्महत्या करण्याआधी मोबाईलमध्ये एक व्हिडीओ काढला होता, त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे.

विरार पश्‍चिमेला असणार्‍या एच अव्हेन्यू, बिल्डिंग नंबर 12 च्या ग्लोबल सिटीमध्ये अमित हा आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. तो मुंबईत कामाला होता. 2 वर्षांपूर्वीच अमितचे लग्न धर्मिता पटेल सोबत झाले. ती 7 महिन्यांची गर्भवती आहे. पण, 9 मार्चला ती घर सोडून निघून गेली. पत्नी घरातून निघून गेल्याने चिंतेत असलेल्या अमितने बुधवारी दुपारी एका लोकलसमोर उडी घेत आत्महत्या केली. त्याआधी अमितने एक व्हिडीओ बनविला होता, ज्यात आपली पत्नी अविश्‍वासू असल्याचा आरोप त्याने केला होता. दरम्यान, पत्नीकडून मानसिक छळ होत असला तरी परिस्थितीशी तडजोड करण्याचा सल्ला त्याच्या आईवडिलांनी त्याला दिला होता. व्हिडिओमध्ये त्याने पालकांची माफी मागितली आहे.

धर्मिता 9 मार्चपासून घरी आली नव्हती तर पोलिसांकडे तक्रार का केली नाही, अशी विचारणा अर्नाळा पोलिसांनी केली असता, हा आमचा खासगी विषय आहे. अमितला धर्मिता पुन्हा येईल, अशी आशा होती. त्यामुळे आम्ही तिची परत येण्याची वाट पाहत असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. या घटनेची वसई रेल्वे पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Tags : mumbai, news, Husband, sucide, wife,