होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवनियुक्त मुख्य सचिव डी के जैन यांनी पदभार स्वीकारला

नवनियुक्त मुख्य सचिव डी के जैन यांनी पदभार स्वीकारला

Published On: Apr 30 2018 5:00PM | Last Updated: Apr 30 2018 5:00PMमुंबई : प्रतिनिधी 

राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आज सोमवार दि ३० रोजी पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते मुख्य सचिव सुमितमल्लिक यांनी त्यांचा पदाची सुत्रे जैन यांच्याकडे सुपूर्द केली. भारतीय प्रशासन सेवेतील १९८३ च्या तुकडीचे अधिकारी असलेले श्री.जैन हे वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून काम पहात होते. मुख्य सचिवांच्या दालनात आज सायंकाळी जैन यांनी पदभार स्वीकारून कामकाजास सुरूवात केली. यावेळी मल्लिक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे प्रधान सचिव आर.ए. राजीव आदी अधिकारी उपस्थित होते.

मुख्य सचिव जैन यांचा अल्पपरिचय असा :-

दिनांक २५ जानेवारी,१९५९ रोजी जन्मलेले जैन हे मुळचे जयपूर,राजस्थान येथील आहेत. एम.टेक. मॅकॅनिकल इंजिनिअर, एम.बी.ए. असे त्यांचे शिक्षण झाले आहे. राज्य शासनाच्या प्रशासनात त्यांनी आतापर्यंत महत्वाच्या पदांवर काम केले असून,त्यांची पहिली पदस्थापना १९८४ मध्ये धुळे येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर १९८५ मध्ये नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी,१९८७ मध्ये उपायुक्त, विक्रीकर, १९९० मध्ये जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९९२ मध्ये अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर येथे ते कार्यरत होते. १९९२ मध्ये सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९९५ मध्ये केंद्र शासनाच्या सेवेत त्यांची नियुक्ती झाली. २००२ मध्ये नियोजन विभागाचे सचिव म्हणून त्‍यांनी काम पाहिले.
यु.एन.आय.डी.ओ. नवी दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यक्रम संचालक म्हणून २००२ मध्ये त्यांची नियुक्ती झाली. पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी विविध ऑटोमोबाईल्स कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिले, मॅन्युअल्स लिहिली. कारखान्यांमध्ये उत्पादन करतानाच उत्पादित माल योग्य प्रकारे कसा होईल, यादृष्टीने काम केले. २००७ मध्ये राज्य शासनाच्या ग्राम विकास आणि जलसंधारण विभागाचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. २००८ ते २०११ या कार्यकाळात केंद्र शासनात पंचायत राज मंत्रालयाचे सह सचिव म्हणून त्यांनी काम केले. जैन यांनी नरेगा-मध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यांच्या कामाची दखल अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी घेतली होती आणि श्री.ओबामा यांनी श्री.जैन यांना यासंदर्भात निमंत्रण देवून त्यांना चर्चेसाठी बोलाविले होते.

२०१५ मध्ये राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर कृषी व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले. दिनांक २९ एप्रिल,२०१६ पासून ते वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहात होते.उत्तम प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असलेले जैन यांना ट्रेकींग आणि वाचनाची आवड आहे.