Fri, Apr 26, 2019 01:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेकडून नाणार प्रकल्प कार्यालयाची तोडफोड (Video)

मनसेकडून नाणार प्रकल्प कार्यालयाची तोडफोड (Video)

Published On: Apr 16 2018 5:58PM | Last Updated: Apr 16 2018 8:19PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

काही झाले तरी कोकणात नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी घेतल्यानंतर मनसे प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक झाली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ताडदेव येथील नाणार प्रकल्पासाठी काम करणार्‍या रत्नागिरी पेट्रोकेमिकल लिमिटेडच्या कार्यालयाची तोडफोड केली. या तोडफोडीप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मनसेचे पाच ते सहा कार्यकर्ते दुपारी साडेतीनच्या सुमारास रत्नागिरी पेट्रोकेमिकलच्या कार्यालयामध्ये घुसले. त्यांनी नाणार प्रकल्पाच्या विरोधात आणि ‘मनसे जिंदाबाद’च्या घोषणा देत तोडफोड करायला सुरुवात केली. कार्यालयातील खुर्च्या आणि दगडांच्या साहाय्याने तेथील काचा फोडल्या. पहिल्यांदा कार्यालयाच्या स्वागत कक्षाची मोडतोड केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आतील एका दालनाचीही तोडफोड केली. त्यानंतर हे कार्यकर्ते तेथून निघून गेले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दोन दिवसांपूर्वी नाणार ग्रामस्थांच्या संघर्ष समितीचे शिष्टमंडळ राज ठाकरे यांना भेटले होते. त्यानंतर रविवारी मुलुंड येथे झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली होती. कुठल्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, असे त्यांनी ठणकावले होते. हवा तर प्रकल्प चंद्रावर घेऊन जा; पण कोकणात प्रकल्प राबवू देणार नाही, सरकारला काय करायचे ते करावे, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्‍तव्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी नाणार प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मात्र, मनसेने खळ्ळखट्याक आंदोलनाचा दणका दिल्याने राज्य सरकारसमोरील अडचण वाढली आहे.

दरम्यान, या तोडफोडीनंतर पोलिसांनी या कार्यालयाला पोलिस बंदोबस्त दिला आहे. तसेच तोडफोडीचे सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. तोडफोड करणार्‍यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, लवकरच संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती ताडदेव पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय कोळेकर यांनी सांगितले.

प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध : विखे-पाटील

नागपूर :  कोकणामध्ये होऊ घातलेला नाणार प्रकल्प गुजरातमध्ये न्यावयाचा असल्याने भाजप व शिवसेना एकमेकांवर आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज नागपुरात केला. नाणार प्रकल्पाला काँग्रेसला विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भंडारा-गोंदिया येथील काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी विखे-पाटील आज नागपुरात आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नाणार प्रकल्पाबाबत राज्य सरकारने भूमिका ठाम राहिली नाही. एक वेळा राज्य सरकारने प्रकल्प होणार असल्याची घोषणा केली होती. लोकांचा विरोध पाहून सरकार बचावाच्या भूमिकेत आले. राज्य शासनाचा विरोध असताना हा प्रकल्प केंद्र सरकार मंजूर कसा करू शकतो, असा सवाल त्यांनी यावेळी केला. भाजप सरकारला हा प्रकल्प गुजरातला न्यावयाचा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री घाट घालत असल्याचे त्यांनी सांगितले. नाणार प्रकल्पाला काँग्रेसला विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.