Sun, Jul 05, 2020 21:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेचे खळ्ळखट्याक!

मनसेचे खळ्ळखट्याक!

Published On: Dec 02 2017 1:29AM | Last Updated: Dec 02 2017 1:21AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

आझाद मैदानजवळील मुंबई प्रदेश काँग्रेसच्या राजीव गांधी भवन कार्यालयाची शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. तोडफोड केल्यानंतर काही वेळातच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली व ईंट का जवाब पत्थर से देण्याचा इशारा दिला. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये असलेले मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी हा भ्याड हल्ला मनसेच्या नपुंसक कार्यकर्त्यांनी केल्याची टीका करुन याचा बदला घेण्याचा इशारा दिला. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याने संदीप देशपांडेंसह 8 कार्यकर्त्यांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना शनिवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. 

या हल्ल्यामुळे काँग्रेस व मनसेमधील वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. निरुपम गुजरात दौर्‍यावर असल्याने शनिवारी मुंबईत येऊन कार्यालयाला भेट देणार आहेत. सकाळी ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात कोणीही जबाबदार पदाधिकारी उपस्थित नव्हते. आघाडीच्या विरोधात भूमिका घेत फेरीवाल्यांना पाठिंबा दिल्याने संजय निरुपम व मनसेमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरू आहेत. या वादाने पुढचे टोक गाठल्याने दोन्ही पक्षांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यालयाला भेट देऊन कार्यालयाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत, मिलींद देवरा, कृपाशंकर सिंह,आमदार आरिफ नसीम खान, भाई जगताप, एकनाथ गायकवाड, मधु चव्हाण आदींसह विविध नेत्यांनी दिवसभर कार्यालयात तळ ठोकला होता. मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी यावेळी मोठा बंदोबस्त ठेवला होता. 

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या हल्ल्याची जबाबदारी ट्वीट करुन  स्वीकारली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक केल्याचे ट्वीट त्यांनी केले. मनसेला डिवचण्याचे काम केल्यास त्याला प्रत्युत्तर  देण्याचा इशारा त्यांनी दिला. मनसेचे विभागप्रमुख अरविंद गावडे व नेते राजन शिरोडकर रात्री उशिरापर्यंत आझाद मैदान पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. 
मनसेचे कार्यकर्ते फेरीवाल्यांकडून मार खात असल्याने त्यांच्यामध्ये फ्रस्ट्रेशन आले आहे. त्यामुळे त्यांनी भ्याड हल्ला केल्याचा पलटवार निरुपम यांनी केला आहे. मनसेचे गुंड सुधारले नाहीत तर त्यांच्यावर असेच हल्ले होतील, असे ट्वीट निरुपम यांनी काही दिवसांपूर्वी केले होते

. विक्रोळीत मनसे हल्ल्याला जशास तसे उत्तर देणार - निरुपम 


मनसेच्या नपुंसक कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर कोणीही उपस्थित नसताना केलेला हा भ्याड हल्ला असून दोषींविरोधात मुख्यमंत्र्यांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी संजय निरूपम यांनी केली आहे. मनसेला जशास तसे उत्तर देण्यात येईल, असे निरुपम यांनी सांगितले. आमच्या कार्यालयापासून आझाद मैदान पोलीस स्थानक अवघ्या 25 मीटर अंतरावर आहे. मात्र तरीही हा हल्ला झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांविरोधात कठोर कारवाई केली नाही तर मनसेला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा निरुपम यांनी दिला आहे.