Tue, Apr 23, 2019 19:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शहीद मेजर कौस्‍तुभ राणे यांना अखेरचा निरोप

शहीद मेजर कौस्‍तुभ राणे यांना अखेरचा निरोप

Published On: Aug 09 2018 12:54PM | Last Updated: Aug 09 2018 12:30PMमुंबई : प्रतिनिधी


काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबरोबर लढताना शहीद मेजर कौस्‍तुभ राणे यांना वीरमरण आले होते. मुंबईत आज शहीद राणे यांचे पार्थिव काही वेळांपूर्वी मुंबईत दाखल झाल्यानंतर अंत्यदर्शन घेऊन त्यांना भावाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी विमानतळावर पार्थिवाचे दर्शन घेऊन राज्य शासनाच्यावतीने पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. मेजर राणे यांचे पार्थिव मालाडच्या सेंट्रल ऑर्डनन्स डेपो येथे व मीरा रोड येथील शीतल नगर येथे निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मेजर राणे यांच्यावर मीरा रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मीरा रोड, भाईंदर येथील हजारो नागरिकांनाी मोठी गर्दी केली होती. भावपूर्ण वातावरण, साश्रू नयनाने त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली होती. लष्करी ट्रकवर फुलांनी सजविलेली शवपेटी, नागरिकांच्या "कौस्तुभ राणे अमर रहे"च्या उत्स्फूर्त घोषणा देण्यात आल्या.

शहीद राणे यांची अंत्ययात्रा जॉगर्स पार्क जवळील हिंदू स्मशानभूमीत पोहचल्यानंतर अनेकांना अश्रू अनावर झाले.  पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, वरिष्ठ लष्करी अधिकारी यावेळी उपस्‍थित होते.