Sat, Apr 20, 2019 08:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशातील मोठ्या शहरांत पहिला नंबर 

मुंबईतील जीवनस्तर उंचावला !

Published On: Aug 13 2018 7:48PM | Last Updated: Aug 13 2018 7:48PMमुंबई : प्रतिनिधी 

केंद्र सरकारच्या आवासन आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने देशभरात प्रथमच जीवनस्तर निर्देशांक निर्धारित करण्यासाठी संपूर्ण देशभरातील १११ शहरांशी संबंधित विविध बाबींचे अभ्यासपूर्ण सर्वेक्षण करण्यात आले असून यात ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणार्‍या शहरांमध्ये मुंबईने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर देशभरातील अन्य १११ शहरांमध्ये मुंबईचा तिसरा क्रमांक आला आहे. 

 देशातील शहरांमधील जीवनस्तर निर्देशांक २०१८ निर्धारित करण्यासाठी देशभरातील शहरांमधील विविध बाबींचा सर्वस्तरीय व सर्वंकष अभ्यास करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने शहरातील संस्थात्मक, सामाजिक, आर्थिक व भौतिक बाबींशी संबंधित १५ बाबींचा अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये प्रशासन, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, रोजगार, गृहनिर्माण, खुल्या जागा, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आदी बाबींचा समावेश होता. जीवनस्तर निर्देशांकामध्ये देशातील सर्व महानगरांमध्ये सर्वोत्तम क्रमवारी मिळवणार्‍या मुंबईने देशातील लहान-मोठ्या १११ शहरांच्या क्रमवारीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर ४० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मोठ्या महानगरामध्ये मुंबई प्रथम क्रमांकावर असून चैन्नई दुसरा व सुरत शहराने तिसरा हैद्राबाद चौथा, बंगलुरू पाचवा व दिल्ली शहराने सहावा क्रमांक पटकावला आहे. 

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांच्या हस्ते मुंबई महापालिकेला स्वच्छता सर्वेक्षण २०१८ या केंद्र सरकारद्वारे संपूर्ण देशभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणांतर्गत राज्यांच्या राजधान्यांच्या गटात देशभरात मुंबई शहराला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले होते. त्यानंतर जीवनस्तर निर्देशांक २०१८ अंतर्गत देखील मुंबई महापालिकेने आपला अग्रक्रम अबाधित राखल्याने महाराष्ट्राच्या राजधानीच्या गौरवात भर पडली आहे. मुंबईकरांना विविध सेवा सर्वेात्तम पद्धतीने देण्यासाठी महापालिका दीर्घकालीन व अल्पकालीन नियोजनाद्वारे सातत्याने प्रयत्नशील आहे. भविष्यातही याच समर्पित भावनेने महापालिका कार्यरत राहील. हा सन्मान मुंबईकरांचा आणि मुंबई महापालिकेचा गौरव आहे, अशी भावना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी व्यक्त केली.

दुर्घटनांचे शहर 

मुंबईतील जीवनस्तर उंचावण्यासाठी व देशात एक नंबर शहर घोषित करणार्‍या केंद्र सरकारने कोणते निकष लावले. मुंबईतील आरोग्य सेवा सुधारली म्हणायची तर, साथीच्या आजाराने अनेक जणांचे बळी जात आहेत. पाणी टंचाईची झळ आजही अनेकांना सहन करावी लागत आहे. रोजगार व गृहनिर्माणची बोंबच आहे. त्यात गेल्या दोन महिन्यात झाड पडणे व अनेक दुर्घटनामध्ये ४२ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे हे दुर्घटनांचे शहर आहे, असे म्हणणे योग्य असल्याचे मत मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केले.