Wed, Jul 24, 2019 12:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कांदिवली येथे शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची हत्या

कांदिवली येथे शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची हत्या

Published On: Jan 08 2018 8:01PM | Last Updated: Jan 08 2018 8:01PM

बुकमार्क करा
मुंबई :  प्रतिनिधी

सलग दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची रविवारी रिक्षातून पाठलाग करणार्‍या चार जणांच्या एका टोळीने चॉपरने वार करून हत्या केल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. या हत्येच्या घटनेने कांदिवलीत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, या हत्येप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून या हत्येच्या चारही मुख्य आरोपींची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. 

त्यांच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू आहे. अशोक सावंत शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. महिलांसाठी राखीव प्रभाग होताच त्यांनी त्यांचा मुलगी प्राजक्‍ता सावंत हिच्यासाठी तिकीट मागितले होते. त्यानंतर प्राजक्‍ता ही नगरसेविका म्हणून निवडून आली होती. मात्र,  गेल्या निवडणुकीत तिचा सुनीता यादव या भाजपच्या उमेदवाराने पराभव केला होता. रविवारी ते काम संपवून मित्रासोबत त्यांच्या स्कूटरवरून घरी जात होते. यावेळी एका रिक्षाने त्यांच्या स्कूटरला ओव्हरटेक केले. काही कळण्यापूर्वीच रिक्षातून उतरलेल्या चौघांनी अशोक सावंत यांच्यावर चॉपरने वार केले. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले. चारही आरोपी रिक्षातून पळून गेले. मित्राने कंट्रोल रूमला ही माहिती दिली. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह समतानगर आणि गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. सावंत यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. संशयितांच्या  चौकशीतून धक्‍कादायक माहिती पुढे आली. ही हत्या अंतर्गत वादातून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दुसरीकडे व्यावसायिक, खंडणी किंवा आर्थिक वादातून ही हत्या झाली आहे का, याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे.