Sun, Aug 18, 2019 15:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिलची आग मोझोसच्या हुक्कापार्लरमुळे

कमला मिलची आग मोझोसच्या हुक्कापार्लरमुळे

Published On: Jan 06 2018 1:25AM | Last Updated: Jan 06 2018 1:13AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

लोअर परेलच्या कमला मिल कम्पाऊंडमधील आग ‘मोझोस’मधील हुक्कापार्लरमुळेच लागली असल्याचे अग्निशमन दलाने केलेल्या चौकशीत उघड झाले. हुक्क्यामधील जळता निखारा तेथील कापडी पडद्यावर पडल्यामुळे  ही आग लागली. मोझोस व वन अबव्ह या पबच्या छताचे प्लास्टिक लागून असल्याने ही आग हवेच्या झोताबरोबरच पसरली. त्यामुळे नेमकी आग कुठे लागली हे समजले नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कमला मिलमधील वन अबव्ह आणि मोझोस या पबमधील आगीच्या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या वतीने आगीचे कारण शोधण्यासाठी करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल पालिका आयुक्त अजोय मेहता यांना सादर केला. यामध्ये ही आग मोझोसमधूनच सुरू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मोझोस पबमधील दक्षिण- पूर्व कोपर्‍यात असलेल्या हुक्कापार्लरमधील एका हुक्का बॉटलमधील जळता निखारा हा येथील कापडी पडद्याच्या संपर्कात आल्यामुळे ही आग लागल्याचे म्हटले आहे. 

या पबमध्ये 31 डिसेंबरसाठी आकर्षक सजावट करण्यात आली होती. यासाठी पडदे व अन्य साहित्य लावण्यात आले होते. त्यामुळे हा पेटता निखारा या पडद्याच्या संपर्कात आल्यानंतर पडदा आणि प्लास्टिक तसेच डेकोरेटीव्ह साहित्याने पेट घेतला. हे दोन्ही पब गच्चीवर असल्यामुळे दोघांच्या छताचे एकच प्लास्टिक आहे. त्यामुळे संपूर्ण प्लास्टीक तसेच लोखंड जळून ते तेथील लोकांच्या अंगावर पडू लागले. त्यांना बाहेर जाण्याचा एकच मार्ग माहीत होता तो म्हणजे लिफ्ट. त्यामुळे सर्वांनी लिफ्टजवळ गर्दी केली.