Wed, Mar 27, 2019 00:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › समाजाची ताकद वाढल्‍यानेच कारवाई : प्रकाश आंबेडकर

समाजाची ताकद वाढल्‍यानेच कारवाई : आंबेडकर

Published On: Jan 07 2018 9:47PM | Last Updated: Jan 07 2018 9:52PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

भीमा कोरेगाव हल्ल्यानंतर झालेल्या महाराष्ट्र बंद मध्ये आंबेडकरी समाज एकवटल्याने आंबेडकरी समाजाची राजकीय ताकद वाढली आहे. त्याचा धसका घेतल्याने राज्य सरकारने समाजातील तरुणाईला भीती दाखवण्यासाठी पोलिसी कारवाईचा बडगा उगारला आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मात्र दलित समाजातील तरुणांनी व कार्यकर्त्यांनी अजिबात घाबरण्याची गरज नसून त्यांच्याविरोधात केल्या जाणार्‍या कायदेशीर कारवाईला उत्तर देण्यासाठी वकिलांची फौज उतरवण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

 भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलित व ओबीसी समूहावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरात बंद पुकारण्यात आला होता. या बंद मध्ये सहभागी झालेल्यांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली असून राज्यभरात सुमारे 7 हजार कार्यकर्त्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या बंदच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ पुन्हा सक्रिय झाली असून आंबेडकरी चळवळ पुन्हा एकत्र झाली आहे. या चळवळीसोबत ओबीसी समाज देखील जोडला जावू लागल्याने सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. पोलिसांनी राज्यभरात सुरु केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनविरोधात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन हे प्रकार बंद करण्याची मागणी केली होती, मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी त्यासंदर्भात आश्‍वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांनी प्रशासनाला तसे निर्देश दिले की नाही हे माहित नाही, परंतु पोलिसांची कारवाई मात्र सुरु आहे, असे आंबेडकर म्हणाले. 

आंबेडकरी चळवळीच्या वाढत्या ताकदीची धास्ती घेतल्याने कारवाई केली जात आहे. त्यामुळे या कारवाईला उत्तर देण्यासाठी व अटक झाल्यास जामिन व इतर कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी वकील सज्ज आहेत. समाजातील व्यक्तींनी या प्रकाराला घाबरू नये व धीटपणे परिस्थितीला तोंड द्यावे, आम्ही स्वतः त्यांच्यासोबत उभे आहोत. हे राजकीय गुन्हे असून या केसेसचे काय करायचे याचा निर्णय पुढे घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी समाजाला दिली आहे. 

 ज्यापध्दतीने राज्यात 7 हजार कार्यकर्त्यांविरोधात कारवाई सुरु आहे ती जाणिवपूर्वक केली जात आहे. पोलिसांनी अटकेच्या कारवाईला प्रारंभ केला असून कार्यकर्त्यांच्या जामिनासाठी आमचे वकिल कार्यरत आहेत. जिल्ह्या जिल्ह्यातील माहिती सध्या गोळा करत आहे. 10 तारखेला मुंबईत आल्यावर पुढील कार्यवाहीचा निर्णय घेऊ. दलित संघटनांच्या पदाधिकार्‍यांना ताब्यात घेताना पोलिस संघाच्या कार्यक्रमांना मात्र परवानगी देत आहेत, हा दुटप्पीपणा आहे. अशी भूमीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली