Tue, Mar 19, 2019 21:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भविष्यात आयटी क्षेत्रात नोकरीची चिंता

भविष्यात आयटी क्षेत्रात नोकरीची चिंता

Published On: Dec 23 2017 2:32AM | Last Updated: Dec 23 2017 1:54AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

 अमेरिकेत वाढणारी आयटी क्षेत्रातील गुंतवणूक ही भारतीय आयटी क्षेत्रासाठी धोक्याची घंटा आहे. त्याचा थेट परिणाम भारतात भविष्यातील रोजगारनिर्मितीवर होणार असून हे संकट गंभीर असल्याचे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी सांगितले.

आयआयटीच्या मूड इंडिगो या महोत्सवातील चर्चासत्रात ते बोलत होते. भारतातील आयटी क्षेत्र हे प्रामुख्याने अमेरिकन कंपन्यांवर अवलंबून आहे. मात्र अमेरिकेतील सत्ताबदलानंतर ट्रम्प सरकारने देशातच सेवा पुरविणार्‍या कंपन्या स्थापन करण्यास प्राधान्य  दिले आहे. त्यामुळे या क्षेत्रात तेथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. त्याचे परिणाम आपल्या देशात जाणवू लागले आहेत. भारतीय आयटी व्यवसायात मंदी आली आहे. त्यामुळे भविष्यात नोकर्‍यांची संख्याही कमी होऊ शकेल अशी भीतीही मूर्ती यांनी बोलून दाखवले. 

गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रात एक प्रकारची विषमता पाहायला मिळत आहे.  या क्षेत्रात काम करणार्‍या उच्चपदस्थांच्या वेतनात 300पासून ते 500 टक्केपर्यंत वाढ होत आहे. तर नव्याने भरती होणार्‍यांच्या वेतनात मात्र फारशी वाढ होताना दिसत नाही.  ही विषमता चिंताजनक असल्याचेही मूर्ती म्हणाले.

नारायण मूर्ती यांचा हा मुद्दा पुढे नेत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी पूर्वी दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण झालेला विद्यार्थी बेरोजगार आहे असे ऐकण्यात येत होते. मात्र आता आयआयएम किंवा आयआयटीमधील उच्चशिक्षितही बेरोजगार असल्याचे दिसून येते हे भीषण वास्तव असल्याचेही त्यांनी नूमद केले.

यावेळी चिदंबरम यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना मनमोकळेपणे उत्तरे दिली.सद्या गाजत असलेल्या नोटबंदी व जीएसटीविषयी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना चिदंबरम यांनी सरकारच्या या दोन्ही निर्णयांचा चांगलाच समाचार घेतला. जीएसटी म्हणजे संपूर्ण देशात कराचा एकच दर अशी संकल्पना आहे. पण आपल्याकडे लागू करण्यात आलेल्या जीएसटीमध्ये आठ विविध प्रकारचे दर आकरण्यात आल्या आहेत. हा जीएसटी अपेक्षित नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.