होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फेरीवाल्यांची जागा पुढील आठवड्यात निश्‍चित होणार

फेरीवाल्यांची जागा पुढील आठवड्यात निश्‍चित होणार

Published On: Dec 16 2017 1:45AM | Last Updated: Dec 16 2017 1:18AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

 राष्ट्रीय फेरीवाला धोरणाअंतर्गत मुंबईतील फेरीवाल्यांची व्यवसाय करण्यासाठीची जागा निश्‍चिती करण्याचे काम सुरू असून पुढील आठवड्यात नेमक्या कोणत्या जागी फेरीवाले व्यवसाय करु शकतील, हे जाहीर करण्यात येणार आहे. 67 हजारपेक्षा अधिक फेरीवाल्यांच्या जागेची घोषणा महापालिका ऑनलाईन करणार आहे. यापूर्वी 22 हजार 097 फेरीवाल्यांसाठी जागा निश्‍चित करण्यात आली असून अंतिम घोषणा केल्यानंतर फेरीवाल्यांना आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात येणार आहे. 

महापालिकेने मुंबईत 89 हजार 900 फेरीवाला क्षेत्रे निश्‍चित केली असून त्याठिकाणी फेरीवाले आपला व्यवसाय अधिकृतपणे करू शकतील. महापालिकेने यापूर्वी केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये 99 हजार 435 फेरीवाल्यांची यादी तयार केली आहे. फेरीवाल्यांना पुराव्यासाठी विविध कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात येणार असून त्यामध्ये आधार कार्ड असणे अनिवार्य ठरवण्यात आले आहे. 

कागदपत्रांची छाननी करण्यासाठी सॉफ्टवेअर बनवण्यात येत असून कागदपत्रे तपासल्यानंतर अंतिम पात्र फेरीवाल्यांची यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली. गेल्या वेळी झालेल्या सर्वेक्षणामध्ये राहिलेल्या फेरीवाल्यांना आपली पात्रता सिध्द करण्याची आणखी एक संधी देण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर मुंबईत नेमके किती अधिकृत फेरीवाले आहेत, याची आकडेवारी समोर येईल. फेरीवाल्यांची संख्या जागेपेक्षा जास्त असल्यास त्याबाबत टाऊन व्हेंडिंग समिती निर्णय घेईल. 

महिला फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था 

महिला फेरीवाल्यांसाठी महापालिका स्वतंत्र व्यवस्था करणार असून त्यांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था केली जाणार आहे. त्याशिवाय दिव्यांग, ज्येष्ठ फेरीवाल्यांना वेगळी व्यवस्था तयार करण्यात येईल. महिला फेरीवाल्यांचा व्यवसाय अनेकदा फुले विक्री, भाजी विक्री किंवा फळे विक्री असतो. त्यांना या शिवाय वेगळ्या प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी महापालिका प्रोत्साहन देणार आहे. नवीन धोरणानुसार वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळा फेरीवाला विभाग बनवण्यात येईल, जेणेकरुन कपडे व इतर वस्तूंसाठी वेगळ्या विभागात नागरिक खरेदी करु शकतील. 

सन 2014 मध्ये महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये तब्बल 1 लाख 25 हजार फेरीवाल्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 99 हजार 435 जण सर्वेक्षणामध्ये सामील झाले होते. सध्या मुंबईत 15 हजार 159 अधिकृत फेरीवाले आहेत. मुंबईतील 1100 विविध रस्त्यांवर हे फेरीवाले बसू शकतील. एकीकडे महापालिकेने फेरीवाल्यांसाठी जागा निश्‍चित करण्याचा निर्णय घेतला असला तरी आपल्या विभागात फेरीवाल्यांनी व्यवसाय करु नये यासाठी नगरसेवक व सजग नागरिक प्रयत्न करत आहेत. महापालिकेने जागा निश्‍चिती केल्यानंतर याबाबतच्या वादांमध्ये वाढ होण्याची भीती आहे.