Thu, Apr 25, 2019 17:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वेची ‘चिंधीगिरी’; तुटलेले रुळ चिंधी बांधून जोडले!

रेल्वेची ‘चिंधीगिरी’; तुटलेले रुळ चिंधी बांधून जोडले!

Published On: Jul 10 2018 8:45PM | Last Updated: Jul 11 2018 1:37AMमानखुर्द : प्रतिनिधी

हार्बर रेल्वेवर मानखुर्द आणि गोवंडी स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला आणि रुळाचा तुकडा पडला. मात्र या तड्यांवर उपाय म्हणून रुळांना चक्क फडका बांधल्याचे समोर आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे चिंधी बांधून जोडलेल्या या रुळांवरुन चक्‍क 3 लोकलदेखील धावल्या. प्रवाशांच्या जिवाशी हा खेळ खेळला गेला आणि तो उघड होताच सारेच चक्रावून गेले. 

मंगळवारी मुसळधार पावसामुळे रुळावर जागोजागी पाणी साचले आणि लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यातच ऐेन संध्याकाळी गर्दीच्यावेळी मानखुर्द ते गोवंडी रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडा गेल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. रेल्वे प्रशासनचे कर्मचारी रूळ दुरुस्त करण्यासाठी पोहचले. त्यांनी शक्कल लढवत तडा गेलेल्या रुळाला चक्क कपड्याची चिंधी बांधून तो रूळ तात्पुरता दुरुस्त केला. 

रुळाला तडा गेल्यानंतर दुरुस्ती होईपर्यंत लोकल सेवा थांबवणे अपेक्षित होते. लोकलचा वेग आणि वजन, रुळावरील ताण पाहता, चिंधीचा उपयोग नव्हताच तरीही एका चिंधीच्या भरवशावर तडकलेले रूळ बांधले आणि त्यावरून 3 लोकल धावल्या.  रेल्वे प्रशासनाच्या या चिंधीगिरीने सारेच अवाक् झाले आणि हादरले देखील.