Sun, Jun 16, 2019 03:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हार्बरचे मेगा हाल सुरू!

हार्बरचे मेगा हाल सुरू!

Published On: Dec 23 2017 2:32AM | Last Updated: Dec 23 2017 2:12AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

हार्बर मार्गावर सीवूड-उरण लोकल सेवेसाठी शुक्रवार 22 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. या मार्गावरील काम गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झाल्याने त्याचा हार्बर मार्गावरील अनेक फेर्‍यांवर परिणाम झाला. शुक्रवार, 23 डिसेंबर रोजी 33 फेर्‍या रद्द करण्यात आल्याने पर्यायाने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.

शुक्रवारपासून चार दिवसांचा ब्लॉक घेऊन कामे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अनेकांनी आपल्या खासगी गाड्या रस्त्यावर उतरवल्याने वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. शुक्रवारी सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर प्रवाशांना घरी जाण्यासाठी रस्ता वाहतुकीचा अवलंब करावा लागल्याने ठाण्याच्या दिशेने जाणार्‍या मुलुंड आणि नाहूर जवळ पूर्व दृतगतीमार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. त्यामुळे चाकरमानी रस्त्यावरच वाहनांत अडकून पडले. 

रविवारी 12 लोकल फेर्‍या रद्द करण्यात येणार असल्या तरी विशेष 24 फेर्‍या चालवण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. सोमवारी 25 डिसेंबर रोजी 13 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या दिवशी 100 फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून 104 विशेष लोकल फेर्‍या चालवण्याचा निर्णयही घेतला आहे. ब्लॉकमुळे लोकल प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेकडून नवी मुंबई पालिकेकडे जादा बस सोडण्याची विनंतीदेखील करण्यात आली आहे. सोमवार, 25 डिसेंबर पर्यंत चालणार्‍या या महा ब्लॉकमुळे प्रवाशांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.