होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कॉन्व्हेंट शाळा बंद करून दाखवा : तटकरे

कॉन्व्हेंट शाळा बंद करून दाखवा : तटकरे

Published On: Feb 27 2018 5:04PM | Last Updated: Feb 27 2018 5:36PMमुंबई : प्रतिनिधी

मराठी भाषा दिन सर्वत्र साजरा होत असताना आज राज्यातील  मराठी शाळा बंद करण्यात येत आहे. गाव, वाडीवर असणाऱ्या या शाळा बंद करून इंग्रजीची सक्ती करण्याचा तर सरकारचा विचार नाही ना? अशी विचारणा करत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी मराठी शाळा बंद करू नका, तर शिक्षणमंत्र्यांचे पत्र फेकून देणाऱ्या कॉन्व्हेंट शाळा बंद करण्याचे धाडस दाखवा अशी, मागणी विधान परिषदेत केली. 

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मांडण्यात आलेल्या ठरावावर बोलताना तटकरे यांनी राज्य सरकारकडूनच मराठी भाषेची  उपेक्षा होत असल्याकडे लक्ष वेधत, मराठी शाळा बंद करू नका तर त्या टिकविण्यासाठी प्रयत्न सरकारी पातळीवरून करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. 

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री सांगतात आणि शिवसेना खासदार त्यावर गप्प बसतात, साधा निषेधही केला नाही.  गुजराती लोकराज्य कशासाठी सुरू करण्यात आले? बाळासाहेब ठाकरे असते तर ते सुरू झाले नसते, सतेसाठी एवढी लाचारी योग्य नाही, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांनी  एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.
आयसीएसई, सीबीएसई शाळांतून मराठी हद्दपार होण्यापासून वाचवा

मराठी भाषा दिनी जालना जिल्ह्यातील शिवाची वाडी येथील मराठी शाळा बंद करण्यात येत आहे. दुसरीकडे आयसीएसई, सीबीएसई शाळांतून मराठी  भाषा हद्दपार होत आहे, हे योग्य नाही, असे सांगत कपिल पाटील यांनी मराठी शाळा व  भाषा टिकावी अशी मागणी केली. विजय गिरकर यांनी 12 वी पर्यंत मराठी हा विषय सक्तीचा करण्याची सूचना केली. प्रवीण दरेकर यांनी गाड्यांवरील क्रमांक मराठीत करण्यात यावेत अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे केली. हेमंत टकले यांनी मराठी भाषेच्या विकासासाठी राज्य सरकारने जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. 

मराठी शाळा बंद पडणार नाही - तावडे

मराठी शाळा बंद पडणार नाहीत यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येतील. राज्यात ज्या 1300 शाळा बंद करण्यात येणार आहेत. त्यातील 344 शाळांतील मुले दुसऱ्या शाळेत गेली आहेत.ज्या ठिकाणी ओढे, रस्ते व अन्य अडचणी कमी पटसंख्येच्या शाळांतील मुलांचे स्थलांतर करताना येणाऱ्या अडचणींचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. सीबीएसई, आयसीएसई या सारख्या केंद्रीय विद्यालयात सद्या आठवी पर्यंत मराठी असा नियम आहे. त्या ठिकाणी दहावी पर्यंत मराठी विषय असावा यासाठी निश्चितच प्रयत्न करण्यात येतील, मराठी भाषेची सक्ती करण्याबाबत अभ्यास मंडळाला सभागृहाच्या भावना कळविण्यात येऊन, त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत साहित्यिकांचे शिष्टमंडळ दिल्लीला नेण्यात येईल तसेच या संदर्भात चेन्नई न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निर्णयाचा आधार घेऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी विधानपरिषदेत सांगितले.