Sat, Mar 23, 2019 16:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आगप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

आगप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Published On: Dec 30 2017 1:46AM | Last Updated: Dec 30 2017 1:06AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कमला मिल कंपाऊंडमधील हॉटेल आणि पबला आग लागून 14 जणांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संतोष नारायण खेडेकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल करत, पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम 304, 337, 338 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

लोअर परळमधील पांडुरंग बुधकर मार्गावरील कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीच्या छतावरील वन अबाव्ह आणि मोजोस बिस्त्रो पबला गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमध्ये होरपळून आणि गुदमरुन 14 जणांचा मृत्यू झाला. तर 41 जण जखमी झाले. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी केलेल्या तपासात मे. सी ग्रेड हॉस्पिटॅलिटी आणि एन्टरटेन्मेंट एलएलपी यांच्यासह अन्य अस्थापनांचे व्यवस्थापक, संचालक  व अन्य व्यक्तींनी येणार्‍या ग्राहकांच्या सुरक्षेची योग्य काळजी घेतली नाही. कोणत्याही प्रकारची अग्नीविरोधी यंत्रणा, तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याच्या एकमेव मार्गामध्ये सामान, अडथळे ठेऊन हलगर्जीपणा केला. यामुळे 14 निष्पापांचा जीव गेला. ग्राहकांचा आगीमध्ये होरपळून आणि गुदमरून मृत्यू होत असताना, तसेच जखमींना मदत न करता वरील संबंधित व्यक्ती पळून गेल्याचेही पोलीस तपासात उघड झाले.

अखेर पोलीस नाईक खेडेकर यांच्या फिर्यादीवरून हॉटेलचे मालक हितेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्यासह सर्व सी ग्रेड हॉस्पिटॅलिटी आणि एन्टरटेन्मेंट एलएलपी कंपनीचे मालक व अन्य जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन अबाव्ह आणि मोजोस बिस्त्रो पब तेच चालवत असल्याची माहिती मिळते. याप्रकरणी जखमी व्यक्तींसह प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.