Thu, Jun 27, 2019 17:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › किसान मोर्चा: प्रत्येकाची एक वेगळी कथा आणि वेदना!

किसान मोर्चा: प्रत्येकाची एक वेगळी कथा आणि वेदना!

Published On: Mar 12 2018 3:34PM | Last Updated: Mar 12 2018 3:35PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

कोणत्याही अटींशिवाय कर्जमाफी, शेतमालासाठी योग्य भाव यासह आदी मागण्यासाठी नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा काल मुंबईत येवून धडकला.  या मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी रात्रीच आझाद मैदानात गाठले. १८० किलोमीटरचा प्रवास करून मुंबईत येणाऱ्या या शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे, त्यांना काय हवं नको ते बघणारे लोक होते. पण, त्या मोर्चात अखंड त्यांच्यासोबत  असणारे काही ‘रिअल हिरो’ ही होते. विशेष म्हणजे, हे हिरो त्यांच्यातीलच एक होते. पाहुयात कोण आहेत हे हिरो... 

नाथू निवृत्ती उडा

नाथू, वय ४८... मोर्चात डोक्यावर सोलर पॅनेल घेवून सहभागी झाले होते. ते त्र्यंबक तालुक्यातील गणेशगाव येथील रहिवासी आहेत. १८० किमीचा प्रवासात त्यांच्या डोक्यावरील पॅनेल कधीही खाली उतरले नाही. माझ्या घरी पत्नी, दोन मुले आणि ३ म्हैशी आहेत. चार एकर वन जमिनीचा मालक आहे, असे त्यांनी सांगितले. 

हे सोलर पॅनेल सोबत घेवूनच मोर्चात सहभागी व्हायचे असे मी ठरवले. मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे फोन चार्जिंग करता यावा. त्यांच्या मागे असलेल्या कुटुंबियांशी त्यांना बोलता यावे या उद्देशाने सोलर सोबत घेतल्याचे त्यांनी सांगितले.  

WhatsApp Image 2018-03-12 at 11.37.33


सुंदराबाई मधू भोई

मोर्चात सहभागी झालेल्यांना भुईमूगाच्या शेंगा वाटणारी ही ‘सुंदरा आजी’. ६० वर्षांची ही आजी मोर्चाचे वार्तांकन करायला येणाऱ्या पत्रकारांनाही शेंगा खायला देते. सुंदरा आजी चांदवडमधील दयना गावातील रहिवासी आहे. आजी मोर्चात ७ दिवसांपूर्वी सहभागी झाली होती. 

५ मार्चला मी मोर्चात सहभागी झाले असून गेल्या ८ दिवसांपासून मी या मोर्चात अखंडपणे चालत आहे. आमच्या हक्काच्या वन्य जमिनी आम्हाला मिळाव्यात यासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे, असे या सुंदरा आजीने सांगितले. 

WhatsApp Image 2018-03-12 at 10.39.09


पुष्पराज गोतर्णे

मी अशिक्षित आहे. मला माहिती नाही माझा जन्म कधी झाला. मला माहिती नाही, मी माझी जमीन कधीपासून कसतोय. मला फक्त इतकेच सांगायचे आहे की, मी माझी जमीन कसतोय. माझ्या वडिलांनी आणि त्याआधी माझ्या आजोबांनी ती जमीन कसली होती, असे पुष्पराज यांनी सांगितले.  

माझ्या कुटुंबात ७ लोक आहेत. मला ४ मुली असून १ मुलगा आहे. मी अशिक्षित असलो तरी माझी सर्व मुले शिक्षण घेतात. मोठी मुलगी ५ वीत आहे तर माझा मुलगा लहान आहे. या सर्व कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी माझ्या एकट्याच्या खांद्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.   

WhatsApp Image 2018-03-12 at 10.33.27


मंगेश मांडवे 

पुण्यातील जुन्नरमधील ३१ वर्षीय मंगेश मांडवे हा तरूण मोर्चात सहभागी झाला आहे. यंदाच्या वर्षी शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळावा यासाठी तो मोर्चात सहभागी झाला आहे. किमान आधारभूत किंमतीत समस्या आहेत. माझ्या आजोबांपासून मिळत असलेल्या पेन्शनमध्ये काहीच वाढ झालेली नाही. माझ्या कुटुंबात ६ सदस्य आहेत. 

किमान आधारभूत किंमतीमध्ये एका किलो मागे ५ ते  ७ रूपयांपर्यंत पैसे दलालाला मिळतात. घाऊक व्यापारी तोच माल २० ते ४० रूपयांना विकतो. याबद्दल कोणी काहीच बोलत नाही?, असा सवाल त्यांनी केला. मालाला योग्य तो भाव मिळाल्याशिवाय हा मोर्चा  थांबणार  नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. 

WhatsApp Image 2018-03-12 at 12.14.32


गंगाधर वाघमारे

गंगाधर वाघमारे हा २३ वर्षीय तरूण नाशिक येथील कळवन येथील रहिवासी आहे. माझी जमिन वडिलोपार्जीत आहे. तरीही मला त्याचा ताबा मिळत नाही. ही जमिन आमच्या हक्काची आहे. म्हणूनच त्याची मालकी मिळावी अशी आमची मागणी आहे, असे गंगाधर यांनी सांगितले. 

आमच्याकडे रेशनकार्ड आहेत. माझे वडील शेतकरी आहेत. त्यांना ६०० रूपये पेन्शन मिळते. इतक्याच पैशात आम्ही कसे काय जगू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

WhatsApp Image 2018-03-12 at 10.43.41