Thu, Jul 18, 2019 14:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारच्या पाठिंब्यामुळेच मनसेची हिंमत वाढली!

सरकारच्या पाठिंब्यामुळेच मनसेची हिंमत वाढली!

Published On: Dec 02 2017 1:29AM | Last Updated: Dec 02 2017 12:59AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर केलेल्या हल्ल्याचा निषेध करुन हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी व झालेली नुकसान भरपाई मनसेच्या कार्यकर्त्यांकडून वसूल करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. सरकारच्या मूक पाठिंब्यामुळेच मनसेची हिंमत वाढली असल्याचा आरोप त्यांनी केला. 

माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे माजी सरचिटणीस गुरुदास कामत म्हणाले, आज मुंबई काँग्रेस कार्यालयाची झालेली तोडफोड पाहून धक्का बसला. काही लोक कोणत्या थराला जाऊ शकतात याची प्रचिती आली. सत्तेत बसलेली मंडळी आता अशा लोकांना कसे पाठीशी घालतात, हे देखील समोर आले आहे. 132 वर्षे जुन्या काँग्रेस पक्षाला कोणी अशा पद्धतीने धमकावू शकणार नाही. या हल्ल्याची  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन गुंडांना त्वरित अटक करावी अशी मागणी त्यांनी केली.           

काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी मनसेचे कृत्य चुकीचे असल्याचे मत मांडले आहे. मात्र महात्मा गांधींच्या शिकवणीवर चालण्याचा दावा करणार्‍या मुंबई काँग्रेसने हल्ल्याचा बदला घेण्याची भाषा वापरणे देखील अयोग्य आहे. मनसे विरोधात आंदोलन करताना बांगड्या दाखवणे हे कितपत योग्य आहे, हा महिलांचा अपमान नाही का असा प्रश्‍न नीतेश यांनी उपस्थित केला आहे. 
राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी या हल्ल्याचा निषेध करुन मनसेच्या हल्लेखोरांविरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याविरोधात युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष गणेश यादव व कार्यकर्त्यांनी मनसे विरोधात घोषणाबाजी केली व मनसेचे झेंडे जाळून आपला राग व्यक्त केला. 

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या हल्ल्याचा निषेध करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाणिवपूर्वक निष्क्रिय कारभारामुळे असे प्रकार घडत असल्याची टीका केली. राज्य सरकारचा या प्रकाराला मूक पाठिंबा असल्याचा आरोप त्यांनी केला.