Thu, Aug 22, 2019 13:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खड्ड्याने घेतला डॉ. वझे यांचा बळी

खड्ड्याने घेतला डॉ. वझे यांचा बळी

Published On: Dec 09 2017 2:08AM | Last Updated: Dec 09 2017 1:34AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

शालेय विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाच्या आवड निर्माण व्हावी, बुद्धिबळाचा विकास व्हावा म्हणून बुद्धिबळ आयोजनाची आगळीवेगळी चळवळ सुरू करणारे बुद्धिबळ संघटक आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे सुवर्णपदक विजेते क्रिकेट पंच डॉ. प्रकाश वझे यांचे ठाणे येथे अपघातात निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. आपल्या स्कूटरने ते ठाणे येथे बुद्धिबळ स्पर्धेच्या नियोजनासाठी गेले होते. दुपारी 2 च्या दरम्यान मुलुंडजवळ खड्डा चुकवताना त्यांची स्कूटर घसरली आणि मागून येणार्‍या ट्रकने त्यांना ठोकरले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातात स्कूटरवर मागे बसलेला त्यांचा सहाय्यक नागप्पा हेडगे गंभीर जखमी झाला आहे. हेडगे याच्यावर पालिकेच्या सावरकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी घाटकोपरच्या भटवाडीतील ट्रकचालक नीलकंठ पांडुरंग चव्हाण(48) याच्यावर  कलम 304 अ , 279, 338 अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली.

डॉ.वझे मुलुंड पूर्वेतील जिव्ही  स्कीम रोड 2 येथे राहत होते. हनुमान चौकात त्यांचा दवाखाना आहे. डॉ. वझे यांना क्रिकेटची प्रचंड आवड असली तरी गेली 20 वर्षे शालेय विद्याथ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करणे ही त्यांची प्राथमिकता झाली होती. त्यांनी वर्षाला सहा विविध बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करून बुद्धिबळ चळवळ सुरू केली होती. 

डॉ. वझे यांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या अनेक प्रथम श्रेणी सामन्यामध्ये अंपायर म्हणूनही काम पहिले होते. त्यांनी अनेक वर्षे नवोदितांसाठी मोफत क्रिकेट अंपायर प्रशिक्षण शिबीरे आयोजित केली होती. डॉक्टर प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी टेनिस, डबल विकेट क्रिकेट, बॅडमिंटनच्या राज्यस्तरीय स्पर्धांही आयोजित केल्या होत्या.