Fri, Apr 26, 2019 09:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉक्टरांना कट प्रॅक्टिस करण्यास बंदी

डॉक्टरांना कट प्रॅक्टिस करण्यास बंदी

Published On: Dec 26 2017 9:00PM | Last Updated: Dec 26 2017 9:00PM

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

आपल्याकडे येणार्‍या रुग्णांना विशिष्ट प्रयोगशाळांमध्येच विविध चाचण्या करण्यासाठी पाठविणे, आपल्या ओळखीतील मेडिकल स्टोअर्समधून औषधे खरेदी करण्यासाठी आग्रह धरणे किंवा स्वतःकडे रुग्ण बरा होत नसल्याचे सांगून एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे पेशंट पाठविणे म्हणजेच डॉक्टरांच्या कट प्रॅक्टिसवर लवकरच बंदी येणार आहे. मार्च 2018 मध्ये विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय धिवेशनामध्ये अशा प्रकारच्या प्रॅक्टिसवर बंदी आणणारे विधेयक मांडण्यात येणार आहे.

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून कट प्रॅक्टिसचे पेव फुटले आहे. केवळ खासगीच नाही, तर निमशासकीय आणि सरकारी रुग्णालयांमधील अनेक डॉक्टर आपल्याकडे येणार्‍या रुग्णांना बाहेरच्या प्रयोगशाळांमधूनच विविध चाचण्या करण्यास भाग पाडत आहेत. विशिष्ट कंपन्यांची औषधे लिहून देणार्‍या डॉक्टरांनाही संबंधित कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला दिला जातो. काहींना परदेशवारीसाठी पाठवले जाते. रुग्णांच्या खिशातूनच डॉक्टरांना कमिशन दिले जात असल्याची गंभीर दखल वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतली आहे. तज्ज्ञांनी तयार केलेला मसुदा सध्या विधी व  न्याय विभागाकडे पाठविण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक मंजूर झाल्यास अशाप्रकारचा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असा दावा वैद्यकीय शिक्षण विभागातील एका अधिकार्‍याने केला.

विशिष्ट प्रयोगशाळा, मेडिकल स्टोअर्सचा आग्रह करणार्‍या डॉक्टरच्या विरोधात रुग्णाने जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये तक्रार केल्यास गुन्हा दाखल केला जाईल. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर पहिल्या वेळेला एक वर्षे शिक्षा व 50 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. याच डॉक्टरने दुसर्‍यांदा अशा प्रकारचा गुन्हा केल्यास दोन वर्षे शिक्षा व एक लाख रुपये दंड शिवाय त्याचे लायसन्स रद्द करण्याची तरतूद या कायद्यात असल्याचे समजते.