मुंबई : प्रतिनिधी
गोविंदा रे गोपाळा म्हणत बॅन्जोच्या तालावर थिरकणारे गोविंदा शिस्तबद्ध पद्धतीने थर रचून हंडीला दिलेली सलामी, त्यानंतर होणारा एकच शोर अशा वातावरणात दहीहंडीचा आनंद मुंबईकर अनुभवतील. गल्ली-गल्लीत, नाक्यानाक्यावर लाऊडस्पीकर आणि डीजेवर ढाक्कुमाकूम...ढाक्कुमाकूम दणदणाटासोबत बोल बजरंग बली की जय... गोविंदा रे गोपाळा...चा आवाज घुमणार आहे. अवघी महामुंबई तसेच उपनगरे दुमदुमून निघणार आहेत. मानवी मनोर्यांचा हा चित्तथरारक खेळ पाहण्यास लोकांची गर्दी होणार आहे.
दहीहंडीच्या उंचीवर न्यायालयाचे निर्बंध, अनेक बंधणे यामुळे आयोजकांमध्ये फारसा उत्साह निर्माण झालेला नाही, तसेच गेल्या महिनाभरापासून दहीहंडी पथकांनी सुरू असलेला सराव शनिवारीच रात्री पूर्ण केला. रविवारी मध्यरात्री कृष्णजन्माचा उत्सव झाल्यानंतर मोठमोठ्या गोविंदा पथकांतील गोविंदा शोर मच गया शोर, देखो आया माखनचोर म्हणत गोंविदा पथके मुंबई उपनगरांत तसेच मुंबई बाहेर निघणार आहेत सकाळपासूनच वरळी, दादर, गिरगाव. लालबाग या भागात गोविंदांचा उत्साह बघायला मिळणार आहे. मुंबईच्या अनेक ठिकाणी सुरू असलेल्या थरांचा सराव, मुंबईतील अनेक गोविंदापथकांनी मानापासून ते मोठ्या रकमेच्या हंड्या फोडण्याचा केलेला मानस, आयोजन कमी, मात्र उत्साह शिगेला अशा वातावरणात सोमवारी मुंबईत ढाक्कुमाक्कुमचा जोर चांगलाच रंगणार आहे.
वरळीच्या जांबोरी मैदानात होणारी दहीहंडी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेने हायजॅक केल्याने दहीहंडीच्या अगोदरच राजकीय चढाओढींना रंग चढला आहे. हाच रंग भायखळा, गिरगाव, लालबाग, दादर, माहीम, प्रभादेवी, माटुंगा आणि धारावी परिसरात राजकीय नेत्यांसह स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या व मंडळांच्या हंड्या गोविंदांचे लक्ष वेधून घेतले जाणार आहे. पूर्व उपनगरात कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, मुलुंड आणि भांडुपसह पवई येथील राजकीय आणि मंडळांच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा सज्ज झाले आहेत.
पश्चिम उपनगरात राजकीय हंड्यांची संख्या अधिक असून, येथील हंडी फोडण्यासाठी अधिकाधिक गोविंदांची पथके येथे दाखल होणार आहेत. दरम्यान, वरळी, दादर, घाटकोपर, काळाचौकी, चेंबूर, दहिसर येथील मोठ्या हंड्यांकडे गोविंदा पथकांचे अधिकाधिक लक्ष असणार आहे. वर्सोवा, दिंडोशी, बोरिवली, दहिसर आणि अन्य ठिकाणी अनेक ठिकाणी मानाच्या हंड्या फुटणार आहेत. तंबाखू, गुटखा व्यसनमुक्तीसह पर्यावरणपूरक संदेश दिला जाणार आहे. येथे सलामी देणार्या पथकांमध्ये प्रथम सलामी देणार्या महिला गोविंदा पथकाला प्राधान्य देण्यात येणार असून थरांच्या रकमेव्यतिरिक्त महिला गोविंदा पथकांना 5 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येणार आहे. याठिकाणी मुंबई, ठाणे येथील सुमारे शंभर गोविंदा पथके सलामी देणार आहेत.
संस्कार प्रतिष्ठान आयोजित दहिसरच्या मानाच्या दहीहंडीत पहिली सलामी शहीद जवानांना दिली जाणार आहे. ही 11 लाखांची हंडी आहे.शिवसेना दिंडोशी विधानसभा पुरस्कृत व कल्पतरू युवा प्रतिष्ठानच्या वतीने दिंडोशीत मानाची हंडी मालाड पूर्व, कुरार गाव, त्रिवेणी नगर, आकांक्षा इमारतीसमोर आयोजित करण्यात आली आहे.
घाटकोपर येथील श्रेयस सिग्नलजवळ दहीहंडी उत्सव मोठ्याप्रमाणात साजरा केला जाणार आहे.येथे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार उपस्थित राहणार आहेत.त्याच बरोबर विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि राजकीय नेत्यांची रेलचेल रहाणार आहे.
लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे घाटकोपरच्या भटवाडी विभागात दहीहंडी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. येथेही राजकीय व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. उपनगरात सकाळ पासूनच मुंबईभरातील गोविंदा पथके येथे दाखल होणार असून महिला गोविंदा पथकांनाही थरांचे मनोरे रचण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. घाटकोपर पूर्व येथे पारंपरिक पद्धतीने थरांची स्पर्धा न करता सुरक्षित दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा मित्र मंडळतर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तीन मंदिर नाका , पंतनगर इथे ही दहीहंडी होईल.