Tue, Jul 07, 2020 11:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या आयुक्तांनी शिवसेनेला गुंडाळले

मुंबई आयुक्तांचा 'दुतोंडी'पणा 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : राजेश सावंत 

मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांचा 'दुतोंडी'पणा चव्हाट्यावर आला आहे. काही वर्तमान पत्रांना हाताशी धरून, पेरण्यात आलेली बातमीच त्यांच्या चांगलीच अंगलट आली. त्यामुळे स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी त्यांनी सभागृहात तो मी नव्हेच..अशी भूमिका घेत, वर्तमानपत्राच्या बातमीशी आपला काही संबंध नसल्याचे सांगण्याचा केविलवाणी प्रयत्न केला. आयुक्तांच्या गोड बोलण्याने सत्ताधारी शिवसेना खुश झाली. पण, आयुक्तांनी आपल्याला गंडवल्याचे त्यांना समजलेच नाही.

मुंबई महापालिकेतील सत्तेच्या गादीवर शिवसेना बसली असली तरी, सत्तेची दोरी पालिका आयुक्तांच्या हातात आहे. त्यामुळे आयुक्तांच्या इशार्यावर शिवसेना नंदीबैलाप्रमाणे माना डुलवत आहेत. सत्ताधार्‍यांमध्ये धमक नसल्यामुळे आयुक्त म्हणतील ती पूर्व दिशा मानली जात आहे. त्यामुळे स्थायी समितीचेच नाही तर, पालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचे महत्त्‍व कमी झाले आहे. अलिकडेच आयुक्तांनी काही मोजक्या वर्तमान पत्राना हाताशी धरून, बेस्ट उपक्रमावर प्रशासक नेमण्याची बातमी पेरली. एवढेच नाही तर, आपण घेतलेल्या निर्णयाचे परिपत्रकही वर्तमान पत्रांना दिले. दुसऱ्या दिवशी बातमी छापून आल्यावर त्यांच्या खास व्यक्तीने फोन करून पत्रकारांचे आभार मानले, अशा बातम्या आपल्या माणसांकरवी अनेकदा पेरल्या. पण, बेस्टवर प्रशासक नेमण्याची बातमी आयुक्तांच्या चांगलीच अंगलट ठरली. पालिका सभागृहात या बातमीचा आधार घेत, शिवसेनेने आवाज उठवला. एवढेच नाही तर, आयुक्तांना सभागृहात बोलवा, अशी मागणी केली. त्यामुळे आयुक्तांना सभागृहात यावे लागले. सभागृहात नेहमीप्रमाणे गोड बोलत आयुक्तांनी स्पष्टीकरण देऊन, प्रशासक नेमण्याच्या निर्णयावर एक शब्दही उच्चारला नाही. पण सभागृहाने प्रशासक नेमण्याच्या निर्णयाचे उत्तर द्या, अशी मागणी केली. यावर आयुक्तांनी पलटी मारत, प्रशासक नेमण्याची पालिका अधिनियमात तरतूद नाही. प्रशासक नेमायचा असेल तर, कायद्यात बदल करावा लागेल, असे सांगत तो अधिकार तूमचा असल्याचे सभागृहात स्पष्ट केले. आयुक्तांनी मारलेल्या या पलटीचा शिवसेनेला अंदाजच आला नाही. त्यामुळे आयुक्तांच्या उत्तराने या वादावर पडदा पडला. 

महापालिकेत १५ वर्षापूर्वीचा काळ असता तर, शिवसेना नगरसेवकांनी तत्कालीन आयुक्त करूण श्रीवास्तव यांची अवस्था केली, तशीच अवस्था अजोय मेहतांची झाली असती. श्रीवास्तव महापौरांना न सांगता सभागृहातून उठून गेल्यानंतर, शिवसेनेच्या रणरागिणींनी त्यांच्या दालनात जाऊन थेट कॉलरला हात घातला होता. त्यांच्या दालनाबाहेरील कुंड्याही फोडल्या. त्यामुळे घाबरलेल्या श्रीवास्तव यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मातोश्रीवर जाऊन पाय पकडावे लागले. आता मेहतांच्या उधळणार्‍या घोड्याला आवर घालण्यासाठी त्यांचा श्रीवास्तव करावा लागेल. अन्यथा पालिकेच्या सभागृहाचे किंबहूना शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.