मुंबई : प्रतिनिधी
पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी विकास आराखड्याच्या मोबाईल अॅपचे महापौर व नगरसेवकांना निमंत्रण न देता परस्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६ डिसेंबर रोजी लोकार्पण केले. याच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसेनेने पालिका सभागृहात आयुक्त हाय.. हाय..च्या घोषणा दिल्या.
या वेळी स्पष्टीकरण करण्यासाठी आयुक्तांनी सभागृहात उपस्थित राहण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली, पण आयुक्त सभागृहात न आल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवक राजूल पटेल, श्रध्दा जाधव, विशाखा राऊत व अन्य नगरसेवकांनी थेट आयुक्तांच्या दालनात जाऊन त्यांना घेराव घातला. त्यामुळे आयुक्तांना सभागृहात यावे लागले. सभागृह आणि सभागृहाबाहेर बराच वेळ हा गोंधळ सुरू होता.