होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धर्मा पाटील कर्जबाजारी?, निरूपम यांचे अज्ञान

धर्मा पाटील कर्जबाजारी?, निरूपम यांचे अज्ञान

Published On: Jan 29 2018 3:24PM | Last Updated: Jan 29 2018 3:33PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

संपादित जमिनीसाठी योग्य मोबदला न मिळाल्याच्या कारणावरून धुळे जिल्‍ह्यातील धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन केले होते. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मुंबईतील जे.जे. रुग्‍णालयात ८० वर्षीय धर्मा पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. त्‍यांच्या निधनाने सरकारवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनीही सरकारवर टीका केली आहे. मात्र, ही टीका करताना त्‍यांचे अज्ञान चव्हाट्यावर आले आहे. निरूपम यांना पाटील यांच्या निधनाचे कारण माहित नसल्‍याचे त्‍यांनी केलेल्‍या ट्वीटवरून समोर आले आहे. 

धर्मा पाटील यांनी २२ तारखेला रात्री उशिरा मंत्रालयासमोर विष प्राशन केले होते. त्यांनंतर जे.जे. रुग्‍णालयात त्‍यांच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान त्यांचे डायलिसीसही करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांचा काल रात्री मृत्यू झाला. 

सरकारने संपादित केलेल्‍या जमिनीसाठी योग्‍य मोबदला न मिळाल्‍याने पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन केले होते. मात्र, निरूपम यांनी केलेल्‍या ट्वीटमध्ये पाटील यांनी कर्जाला कंटाळून आत्‍महत्‍या केल्‍याचे म्‍हटले आहे. ‘‘महाराष्‍टातील शेतकरी धर्मा पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. त्‍यांनी कर्जाला कंटाळून आत्‍महत्‍या केली. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मंत्रालयात पाटील यांनी विष प्राशन केले. लाज नसणाऱ्या सरकारने त्‍यांना वाचवले नाही. तर, त्‍यांचे कर्जही माफ केले नाही.  त्‍यांना मरू दिले.’’ अशा अशयाचे ट्वीट निरूपम यांनी केले आहे. 

 

 

 

निरूपम यांच्या ट्वीट नंतर त्‍यांच्यावर सोशल मीडियातून टीका सुरु झाली आहे. यावेळी त्‍यांनी सारवासारव करत, ‘‘एका शेतकर्यानी शासनाचा छळा ला कंटाळून प्राण गमावले हा मुद्दा महत्वाचा आहे, कारण नाही.’’ असे उत्‍त दिले. मात्र, त्‍यांना पाटील यांचा मृत्‍यू नेमका कशामुळे झाला हेच माहित नसल्‍याचे त्‍यांचा अज्ञानपणा चव्हाट्यावर यायचा राहिला नाही.