Tue, Jul 23, 2019 07:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण!

मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण!

Published On: Jun 24 2018 8:06AM | Last Updated: Jun 24 2018 8:06AMमुंबई : प्रकाश साबळे

मुंबई काँग्रेसमधील माजी खासदार गुरुदास कामत यांच्या गटाला मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी आणखी एक झटका दिला. यामध्ये मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे माजी मुंबई अध्यक्ष गणेश कांबळे यांची हकालपट्टी केली आहे. त्यांनी मुंबई काँग्रेसविरोधात आवाज उठवून निरूपम हटाव असा सोशय मीडियावर प्रचार केल्याने त्यांना पक्षातून 6 वर्षांकरिता निलंबित करण्यात आले. त्यांच्या या निलंबनाच्या समर्थनात कांदिवलीत जागोजागी गणेश कांबळे यांच्या हकालपट्टीचे बॅनरही झळकले आहेत. मात्र, यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

गोरेगाव येथे आलेले पक्षाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना भेटण्यासाठी ओळखपत्र देण्याची मागणी कांबळे यांनी निरूपम यांच्याकडे केली. ते देण्याचे आश्‍वासनही निरुपम यांनी दिले. परंतु, आदल्यादिवशी ओळखपत्र संपल्याचे कारण निरूपम यांनी दिले. यामुळे संतापलेल्या कांबळेंनी निरुपम यांच्याविरोधात सोशल मीडियामध्ये उघडपणे टीका केली. यामुळे पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी निरुपम यांनी शिस्तभंगाची कारवाई म्हणून कांबळेंना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले. मात्र, असे करताना निरूपम यांनी इतर पदाधिकारी किंवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांनाही काही कळवले नाही, असार आरोप केला जात आहे. यामुळे उत्तर, पश्‍चिम मतदार संघात काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

निरूपम यांच्या अहंकारामुळे 3 माजी आमदार, 13 आजीमाजी नगरसेवकांनी पक्ष सोडला. मुंबई काँग्रेसच्या मोर्चामध्ये 100 कार्यकर्तेही जमत नाहीत. पक्ष वाढण्यापेक्षा तो कमी होत चालला आहे. पालिका निवडणुकीत केवळ 25 नगरसेवक निरूपम यांना निवडून आणता आले. वॉर्ड 39 मध्ये इच्छूक असतानाही एनवेळी भाजप कार्यकर्त्या कुसुम गुप्‍ता यांना उमेदवारी देवून आपणास डावलण्यात आले. गेल्या 133 वर्षांत पक्षात अशी पिछेहाट झाली नव्हती. अशाप्रकारे निरुपम यांनी दलितविरोधी भूमिका घेतल्याने त्याचा फटका काँग्रेसला पालिका निवडणुकीत बसल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. यासर्व प्रकारामुळे मुंबईतील माजी खासदार गुरूदास कामत, प्रिया दत्त आणि मुरली देवरा हे दिग्गज नेते नाराज आहेत. यामुळे ते लांब राहणे पसंद करत आहेत. यामुळे अशा अवस्थेत काँग्रेससाठी मते मागणार कोण? असा सवालही कांबळे यांनी केला.

गणेश कांबळे विद्यार्थीदशेपासून काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्यांनी युवक अध्यक्ष, सरचिटणीस आणि मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती सेल अध्यक्ष अशी पदे भूषवली. त्यांचे सोनिया गांधी, राहुल गांधीनी कौतुकही केले. गुरूदास कामत यांच्या कार्यकाळात कांबळेंना दौर्‍यांसाठी पक्षाने गाडीही दिली.

गणेश कांबळे यांनी काँग्रेस पक्षाची बदनामी केली. त्यामुळे त्यांचे पक्षाने निलंबन केले. त्यांना वेळोवेळी समज दिली होती. परंतु त्यांच्यावर परिणाम झाला नाही. शेवटी निर्णय घ्यावा लागला. - संजय निरुपम, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस