Wed, Apr 24, 2019 07:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संजय निरुपम यांच्यासाठी धोक्याची घंटा; मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल शक्य

संजय निरुपम यांच्यासाठी धोक्याची घंटा; मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल शक्य

Published On: Sep 01 2018 10:06AM | Last Updated: Sep 01 2018 9:55AMमुंबई : राजेश सावंत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्या आकस्मिक निधनामुळे कामत गटाचे कार्यकर्ते बिथरले आहेत. या कार्यकर्त्यांचा विद्यमान मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावरील राग कायम आहे. कामत यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तो दिसूनही आला. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी देवरा गटाशी हातमिळवणी करून पुढील राजकीय वाटचाल सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही निरुपम यांच्यासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.

मुंबई काँग्रेसमधील गटा-तटाच्या राजकारणामुळे गेल्या पाच वर्षांत काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतच नाही तर, फेबु्रवारी 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेसला 227 पैकी जेमतेम 31 नगरसेवक निवडून आणता आले. या निवडणुकीत काँग्रेस तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला. त्यात आता गुरुदास कामत यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे कामत यांना मानणारा कार्यकर्ता बिथरला आहे. विद्यमान मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांचे नेतृत्व स्वीकारण्यास कामत यांचे कार्यकर्ते कधीच तयार होणार नाही. कामत यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी काही कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली होती. त्यामुळे कामत गटाच्या कार्यकर्त्यांसाठी मिलिंद देवरा हा एकमेव पर्याय दिसत आहे.

कामत यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्यापेक्षा देवरांचे नेतृत्व स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. तशी एक गुप्त बैठकही अंधेरीत झाल्याचे बोलले जात आहे. हा संदेश थेट दिल्लीपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी दक्षिण मुंबईतील माजी खासदार मिलिंद देवरा यांना पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिल्लीतून मिळाले असल्याचे समजते. गांधी घराण्याशी देवरा कुटुंबाचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत असलेल्या मित्रत्वाच्या नात्यामुळे मिलिंद देवरांकडे मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमध्ये मोठा बदल होऊ शकतो, असे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

दत्त-गायकवाड गटाचा देवरांनाच पाठिंबा !

मुंबई काँग्रेसमध्ये माजी खासदार प्रिया दत्त व माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचाही स्वतंत्र गट आहे. या गटाची संपूर्ण मुंबई शहरात फारशी ताकद नसली तरी, त्यांच्या लोकसभेत त्यांना मानणारा कार्यकर्ता आहे. या दोन्ही माजी खासदारांना आपल्या गटात सामील करण्यात देवरा यशस्वी झाले तर, निरुपम यांच्या गटाचे भवितव्य धोक्यात येऊ शकते.

उत्तर-पश्‍चिम मुंबईसाठी निरुपम !

उत्तर-पश्‍चिम लोकसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार गुरुदास कामत यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी संजय निरुपम यांचे नाव पुढे आले आहे. पण हा मतदारसंघ कामत यांचा बालेकिल्ला असल्यामुळे येथील काँग्रेस कार्यकर्ते निरुपम यांना मदत करणार नसल्याची भीती वरिष्ठांना वाटत आहे. त्यामुळे निरुपम यांचा येथील रस्ता बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.