Tue, May 21, 2019 04:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भुजबळांना जामीन मिळण्याची शक्यता

भुजबळांना जामीन मिळण्याची शक्यता

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी 

गेल्या पावणेदोन वर्षापासून आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या छगन भुजबळ यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मनी लॉन्ड्रिंग कायद्यातील कलम 45 सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविल्यानंतर छगन भुजबळ यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. सुनावणीच्या वेळी ईडीचे वकील गैरहजर राहिल्याने अर्जावरील सुनावणी 1 डिसेंबरपर्यंत तहकूब ठेवण्यात आली. मात्र, पुढच्या सुनावणीच्या वेळी त्यांना जामीन मिळू शकतो.  

छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याबरोबरच बेहिशोबी मालमत्ता जमविल्याचा आरोप आहे. ईडीने त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग कायद्यातील कलम 45 लावले होते. त्यामुळे त्यांना आत्तापर्यंत जामीन मिळालेला नाही. या कलमान्वये बेहिशोबी मालमत्ता जमा करणार्‍यांना गुन्हा सिध्द होण्याआधीच अमर्याद काळ तुरुंगात ठेवण्याची तरतूद होती. ही तरतूद घटनाबाह्य ठरविण्यात आल्याने भुजबळ यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी त्यांच्या अर्जावर सुनावणी झाली. त्यांचे वकील अ‍ॅड. शालाभ सक्सेना यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रतही न्यायालयात सादर केली. न्यायालयाने याची दखल घेऊन ईडीला आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले. 
छगन भुजबळ यांना मार्च 2016 मध्ये अटक केल्यानंतर ते आर्थर रोड जेलमध्ये     आहेत. त्यांची प्रकृतीही मध्यंतरी बिघडलेली होती. त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे खासदार समिर भुजबळही तुरुंगातच आहेत. मात्र, छगन भुजबळ यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आशेचा किरण सापडला आहे. आमदार असलेल्या छगन भुजबळ यांना तुरुंगातूनच आपल्या मतदारसंघाची कामे करावी लागत आहेत. पुढच्या तारखेला भुजबळ यांना जामीन मिळू शकतो. भुजबळ यांच्या अर्जावर लवकरच सुनावणी होउन त्यांना जामीन मिळाला तर ते नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सामील होऊ शकतात. छगन भुजबळ तुरुंगात गेल्यानंतर त्यांचे राजकीय वजनही संपुष्ठात आले आहे. त्यांच्या महात्मा फुले समता परिषदेचे कामही ठप्प पडले आहे. त्यांच्या अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणावा तसा त्यांच्या पाठीशी उभा राहीला नसल्याचे शल्य भुजबळ यांना असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. ते जामीनावर सुटल्यानंतर कोणता पवित्रा घेतात याकडेही सर्वांचे लक्ष असेल.