Sun, Sep 23, 2018 08:37



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपकडून इतिहास पुसण्याचा प्रयत्‍न : अशोक चव्हाण

भाजपकडून इतिहास पुसण्याचा प्रयत्‍न : अशोक चव्हाण

Published On: Feb 13 2018 4:02PM | Last Updated: Feb 13 2018 4:02PM



मुंबई : प्रतिनिधी

स्वत:च्या संघटनेचा पूर्व इतिहास काळा असल्याने आणि सरकार चालविण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याने द्वेषग्रस्त व मानसिक घुसमटीत अडकलेल्‍या भाजप नेत्यांनी इतिहासाच्या पानातून महापुरुषांची नावे पुसण्याचा उद्योग चालविला आहे. अशी टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.  

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने महात्मा गांधी, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जीवनचरित्रांवर आधारीत पुस्तकांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाचा हा निर्णय म्हणजे ‘विनोद’च असून भाजपा नेत्यांना मानसिक उपचारांची गरज असल्याचा टोला चव्हाण यांनी लगावला आहे. 

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे सर्व नेते आत्मस्तुतीत गुंग झाले आहेत. नुकतेच खादी ग्रामोद्योग विभागाच्या कॅलेंडरवरून महात्मा गांधीजींचे छायाचित्र काढून व स्वतः चरखा चालवत असल्याचे छायाचित्र टाकणे. दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारख्या नेत्यांच्या जीवनचरित्रांवरील पुस्तकांवर कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी करणे व देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणा-या महापुरुषांची नावे हटवून जनतेच्या मनात आदराचे स्थान नसलेल्या नेत्यांची नावे विविध योजनांना देणे असे अश्लाघ्य प्रयत्न या सरकारने वेळोवेळी केलेले आहेत. 

इतिहासाची विटंबना करून थोर नेत्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे आणि शिक्षण क्षेत्रात ढवळाढवळ करून स्वहितासाठी इतिहासाचे विकृतीकरण करणे असे घृणास्पद प्रकार भाजपच्या केंद्र व विविध राज्य सरकारांकडून सुरु आहेत. पंडीत जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात संघर्ष होता असे खोटे चित्र जाणिवपूर्वक उभे करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने महात्मा गांधी, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र कमीत कमी लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने त्यावरील खर्च कमी केला आहे. नवीन पिढीमध्ये त्यांच्याबद्दलचा आदर कमी व्हावा यासाठीचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे. परंतु गांधी,फुले, आंबेडकर ही केवळ नावे नसून त्यांचे थोर विचार, देश व समाजाकरिता केलेला प्रचंड मोठा त्याग व महान कर्तृत्व त्याबरोबर जोडलेले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा त्यांनी घालून दिलेले आदर्श व त्यांच्या विचारांचा सुगंध  कालातीत असून आताच्याच नव्हे तर येणा-या शेकडो पिढ्यांच्या ह्रदयातून ही नावे पुसणे अशक्य असल्याचे चव्हाण म्हणाले.