Wed, Feb 20, 2019 05:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधानसभा अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप

विधानसभा अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप

Published On: Mar 05 2018 5:41PM | Last Updated: Mar 05 2018 5:41PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षांना सापत्न वागणूक देतात. विरोधी पक्षांच्या सदस्यांना सभागृहात बोलू दिले जात नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात सर्व विरोधी पक्षांनी अविश्वासाचा प्रस्ताव दिल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की, सभागृह हे सार्वभौम आहे. विधानसभा अध्यक्षांनी सर्व सदस्यांना आपली मते मांडण्याची संधी द्यायला हवी. अध्यक्ष पदावर असताना ते कोणत्याही एका पक्षाचे नसतात. परंतु, सभागृहातील त्यांची वर्तणूक सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष असल्यासारखीच आहे.

सभागृहात आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा व मतदान अपेक्षित होते. राज्यातील इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही आम्हाला चर्चा करायची होती. फसवी शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, यासारखे अनेक प्रश्न विरोधी पक्षांना सभागृहात मांडायचे होते. परंतु, सत्ताधारी पक्षच कामकाज होऊ देत नव्हता. सभागृह चालवण्याची जबाबदारी असलेले अध्यक्षही कामकाज सुरळीत चालावे, यासाठी प्रयत्न करीत नव्हते. उलटपक्षी सभागृह तहकूब करून विरोधकांची बोलण्याची संधी डावलली जात होती. त्यामुळे अध्यक्षांकडूनच पक्षपातीपणा होत असल्‍याच्या कारणास्‍तव विरोधी पक्षांना अविश्वास प्रस्तावाचा निर्णय घ्यावा लागला, असे विखे पाटील म्हणाले.