Wed, Jun 26, 2019 17:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबादेवी मंदिराचा विश्‍वस्त रखवाला कोण?

मुंबादेवी मंदिराचा विश्‍वस्त रखवाला कोण?

Published On: Dec 16 2017 1:45AM | Last Updated: Dec 16 2017 1:08AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

मुंबईकरांचे आराध्य दैवत मुंबादेवी मंदिराचे नियंत्रण आता सरकारकडे राहणार आहे. त्यामुळे शिर्डीच्या साई मंदिर व प्रभादेवीच्या श्री सिध्दिविनायक मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिराचा कारभार पाहण्यासाठी विश्वस्त मंडळ नेमण्यात येणार आहे. त्यामुळे या मंदिराच्या विश्‍वस्त पदाच्या प्रमुख पदावर नियुक्ती व्हावी, यासाठी भाजपामध्ये आतापासून जोरदार फिल्डींग लागली आहे. 

   शिर्डीचा साईबाबा मंदिर न्यास व प्रभादेवी सिध्दीविनायक न्यास ही महाराष्ट्रातील श्रीमंत देवस्थाने आहेत. त्यामुळे या मंदिराच्या विश्‍वस्त पदासाठी राज्यातील सत्ताधार्‍यांमध्ये रस्सीखेच चालते. राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर येथील विश्‍वस्त प्रमुख बदलण्यात आले. भाजपाने शिर्डी संस्थानचा कारभार हाती घेतल्यामुळे शिवसेनेकडे प्रभादेवी मंदिर सोपवण्यात आले. आता या मंदिरांच्या रांगेत मुंबादेवी या प्राचीन मंदिराची भर पडणार आहे. आतापर्यंत खाजगी संस्थांच्या ताब्यात असलेल्या मुंबादेवी मंदिरावर राज्य सरकारचे नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे साहजिकच या मंदिराच्या विश्‍वस्त मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेते राज पुरोहित व भाजपाचे माजी आमदार नगरसेवक अतुल शहा यांच्यात जोरदार चुरस लागली आहे.  या मंदिरावर सध्या राज पुरोहितांचे वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांचे सुपुत्र नगरसेवक आकाश पुरोहित यांना विश्‍वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.   आकाश पुरोहित म्हणाले, पापा बघतील काय करायचे ते! अतुल शहा यांचे भाजपातील वरिष्ठ नेत्यांशी घरोब्याचे संबंध असल्यामुळे त्यांनी मुंबादेवीच्या विश्‍वस्त पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.