Sun, May 19, 2019 14:12
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलेली वेतनवाढ मान्य  : कृती समिती

एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलेली वेतनवाढ मान्य  : कृती समिती

Published On: Jun 29 2018 5:35PM | Last Updated: Jun 29 2018 5:35PMमुंबई : प्रतिनिधी 

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा तिढा दिवसेंदिवस वाढतच आहे. वेतन कराराची मुदत पुर्ण होऊन २७ महिने झाले आहेत. तरी देखील मान्यताप्राप्त संघटना आणि एसटी प्रशासन वेतनवाढीवर सहमत होताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे एसटीमधील इतर संघटनी  परिवहन मंत्र्यानी देउ केलेली ४८४९ कोटी रुपयांची  वेतनवाढ लागू करावी अशी आग्रही मागणी एसटी प्रशासनाकडे केलेली आहे. 

एसटीतील महाराष्ट्र एस टी कर्मचारी संघटना कृती समितीची बैठक याच पश्वभूमीवर मुंबई सेन्ट्रल येथे नुकतीच झाली, त्यावेळी १० नोंदणीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारांचा जास्त अंत न पाहता प्रशासनाने ४८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ कर्मचाऱ्यांना विनाविलंब द्यावी असे मत या बैठकीमध्ये मांडले आहे. व तसे निवेदन सुद्धा एस टी प्रशासन व परिवहन मंत्री व एस टी महामंडळाचे अध्यक्ष, ना.दिवाकर रावते याना दिल्याची माहिती कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांचा २०१६-२०२० या चार वर्षातील कामगार करार रखडलेला आहे. मान्यता प्राप्त संघटनेसोबत वेतन करारासंदर्भात ३३ बैठका झालेल्या आहेत, तरी अद्याप वेतनवाढीचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे कामगारांनी ८ आणि ९ जून रोजी  दोन दिवसांचा अघोषित संप सुद्धा केला होता. त्यामुळे महामंडळाचा दोन दिवसाचा महसुल बुडाला होता, तर अनेक गाड्यांचे नुकसान करण्यात आले होते. बुधवारी झालेल्या बैठकीत देखील मान्यताप्राप्त संघटनेने दिलेल्या प्रस्तावाशी प्रशासनाने  असहमती दर्शविली आहे. 

तर संघटनेने परिवहन मंत्र्याशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितली आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी महामंडळातील इतर नोंदणीकृत संघटनांची बैठक झाली. त्यामध्ये इतर संघटनांनी आपल्याला ४८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ मान्य असल्याचे सांगितले. तसेच प्रशासनाने जाहीर केलेली  वेतनवाढ ज्या कर्मचाऱ्यांना मान्य नाही, त्यांनी तसे लेखी लिहुन देण्यास प्रशासनाने सांगितले होते. पंरतु अद्याप राज्यातील एकाही कर्मचाऱ्यांने तसे लेखी लिहुन दिलेले नाही, यावरुन कर्मचाऱ्यांना देखील ही वेतनवाढ मान्य असल्याचे दिसून येत असल्याचे मत श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.

अघोषित संपात जी आगारे  मोठ्या प्रमाणात बंद राहिली, त्या खातेप्रमुख, घटक प्रमुख अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी या बैठकीत कृती समितीने केली आहे. या बैठकीला  महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे,महाराष्ट एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर, महाराष्ट परिवहन मजदुर युनियनचे सरचिटणीस बबन ढाबरे ,कास्ट्राईब राप कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनिल निर्भवणे,महाराष्ट नवनिर्माण राज्य परिवहन सेनेचे सरचिटणीस, मोहन चावरे,राष्ट्रीय एसटी कामगार कॉग्रेसचे सरचिटणीस डी आर पाटील, बहुजन राप अधिकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्रमोद खरात,राज्य परिवहन यांत्रिक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस जे .जे.पाटील ,महाराष्ट एसटी कामगार कॉग्रेसचे सरचिटणीस दादाराव डोंगरे,रिपब्लीकन एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस देविदास जाधव या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.