होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरावी प्रवेशाची आज विशेष फेरी, ९५ हजार जागा

अकरावी प्रवेशाची आज विशेष फेरी, ९५ हजार जागा

Published On: Aug 18 2018 1:01AM | Last Updated: Aug 18 2018 12:49AMमुंबई : प्रतिनिधी

अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या चार सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांना एकदाही प्रवेश मिळाला नसल्याने या विद्यार्थ्यांसाठी होणारी विशेष फेरी शनिवारी जाहीर होणार आहे. या विशेष फेरीसाठी कोट्यातील जागा जमा झाल्यामुळे तब्बल 95 हजार जागा केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत मिळाल्याने प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी देण्यात आली होती. त्यामुळे गेल्या तीन चार गुणवत्ता यादीत उंचावर गेलेला कटऑफ या स्पेशल फेरीत घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष फेरीसाठीच्या रिक्त जागांची महाविद्यालयनिहाय यादी सोमवारी संकेतस्थळावर जाहीर केल्यानंतर पसंतीक्रम देण्यासाठी मंगळवार शेवटचा दिवस होता. न्यायालयाच्या निर्णयामुळे गेल्या चार यादीत जमा न झालेल्या मुंबई विभागातील अल्पसंख्याक कोट्यातील 50 हजारहून अधिक जागा या विशेष फेरीसाठी जमा झाल्या आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत प्रवेशच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक नामवंत महाविद्यालयांतील जागा मिळण्याची शक्यता आहे. सकाळी 11 वाजता विशेष गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आल्यानंतर 21 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्‍चित करावा लागणार आहे.

 केंद्रीय प्रवेश अकरावी ऑनलाईन फेर्‍यातून मुंबई विभागात आतापर्यंत 1 लाख 26 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्याचबरोबर कोट्यातून 59 हजार 863 विद्यार्थ्यांनी प्रवेेश घेतले आहेत. तर 17 हजार 528 विद्यार्थ्यांना अद्याप एकदाही प्रवेश मिळालेला नाही, तर विविध कारणांनी तब्बल 2 हजार 803 विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत, तर 1 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे, तर 20 हजार 951 विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळाल्यानंतर घेतलेला नसल्याची आकडेवारी आहे.