Sat, Jul 20, 2019 02:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मलेशिया, अर्जेंटिनातून खाद्यतेलाची ‘तस्करी’

मलेशिया, अर्जेंटिनातून खाद्यतेलाची ‘तस्करी’

Published On: Aug 18 2018 1:37AM | Last Updated: Aug 18 2018 1:12AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मलेशिया आणि अर्जेंटिनामधून आयात केलेले खाद्यतेल बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमार्गे भारतात आणले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला दिली आहे. त्यामुळे केवळ आशियात उत्पादित होणार्‍या खाद्यतेलालाच केंद्र सरकारने आयात शुल्कमाफी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमध्ये सूर्यफूल, सोयाबीन पिके घेतली जात नाहीत. मात्र, हे तीनही देश मलेशिया आणि अर्जेंटिनामधून खाद्यतेल खरेदी करून शून्य आयात शुल्काच्या माध्यमातून भारतात निर्यात करतात. त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे, अशी खंत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

महाराष्ट्र हे तेलबिया उत्पादनात देशात आघाडीचे राज्य आहे. सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल याचे सर्वाधिक उत्पादन राज्यात घेतले जाते. त्याशिवाय तूर, उडीद आणि मूग या कडधान्यांचेही राज्यात मोठे उत्पादन घेतले जाते. मात्र, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश या आशियाई देशांमधून होत असलेल्या करमुक्त आयातीचा मोठा परिणाम राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नावर होत असल्याचे दिसून येत आहे. इतर देशांमधून भारतात आयात होत असलेली उत्पादने आयात शुल्क माफीला अपात्र आहेत. आयातशुल्क माफीमुळे देशांतर्गत बाजारपेठेत हे तेल तुलनेत स्वस्तात उपलब्ध होत असल्यामुळे त्याची झळ स्थानिक शेतकर्‍यांना बसत आहे. त्यांना हमीभाव मिळण्यात अडचणी येत असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

आशियाई देशांमधील साफ्ताच्या (साऊथ एशिया फ्री ट्रेड अ‍ॅग्रीमेंट) करारात आशियाई देशांमधील शेती उत्पादनांना आयातशुल्क माफीची सवलत दिली जाते. त्यामुळे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने संबंधित आशियाई देशांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाच्या उत्पादनांनाच आयात शुल्क माफी दिली जाईल,अशी अट या करारात समाविष्ट करावी, अन्य देशांना आयातशुल्क माफीचा फायदा घेता येणार नाही. त्याचा लाभ देशातील तेलबिया उत्पादक शेतकर्‍यांना होईल. पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाला सूचना द्याव्यात, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.