Wed, Jul 24, 2019 14:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ३०० मुलांची प्रत्येकी ४५ लाखांना विक्री?

३०० मुलांची प्रत्येकी ४५ लाखांना विक्री?

Published On: Aug 18 2018 1:01AM | Last Updated: Aug 18 2018 12:46AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा  

आंतरराष्ट्रीय बालतस्करी रॅकेटचा मुख्य सूत्रधार राजूभाई गमलेवाला याला पोलिसांनी अटक केली आहे. तो गुजरातचा रहिवासी आहे. या रॅकेटने भारतातून 300 मुलांची अमेरिकेत प्रत्येकी 45 लाख रुपयांना विक्री केल्याचा संशय आहे. या मुलांचे पुढे नक्की काय झाले, याचा उलगडा झालेला नाही. 

अमेरिकेत कथितरित्या विक्री झालेली ही मुले 11 ते 16 या वयोगटातील असून, ती गुजरातमधील गरीब कुटुंबातील आहेत.त्यांचे पालन-पोषण करण्याची परिस्थिती नसल्याने त्यांच्या पालकांनी त्यांची विक्री केल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले. 

अमेरिकेतील ग्राहकाकडून ऑर्डर आल्यानंतर गमलेवाला आपल्या टोळीला गुजरातमधील मुलाची विक्री करण्याची तयारी असलेल्या गरीब कुटुंबाचा शोध घेण्याचे आदेश देत होता. आपल्या मुलांचे पासपोर्ट भाड्याने देणार्‍या कुटुंबाचाही या टोळीकडून शोध घेण्यात येत होता. तस्करी करण्यात येणार्‍या मुलाच्या चेहर्‍याशी साधर्म्य सांगणार्‍या मुलाचा फोटो असलेला पासपोर्ट निवडण्यात येत होता. त्यानंतर तस्करी करण्यात येणार्‍या मुलाची वाहतूक करण्यासाठी वाहतूकदाराला पैसे देत असे. त्यापूर्वी संबंधित मुलाचा मेकअप केला जात होता. मुलाला अमेरिकेला घेऊन गेलेली व्यक्ती परत आल्यानंतर पासपोर्ट परत केला जात होता. पासपोर्टधारकाच्या उपस्थितीशिवाय त्यावर इमिग्रेशन अधिकारी शिक्का कसा मारीत होते, याचे गूढ आहे. 

मार्चमध्ये या रॅकेटचा भांडाफोड झाला होता. दोन मुलींचा एका सलूनमध्ये मेकअप करण्यात येत असल्याची माहिती अभिनेत्री प्रीती सूदला तिच्या मैत्रिणीने दिली होती. प्रीती संबंधित सलूनमध्ये पोहोचली. कुंटणखान्यात विक्रीसाठी मुलींना नेण्यात येत असावे, असा संशय तिला आला होता. मात्र प्रत्यक्षात हे रॅकेट भलतेच असल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिथे तीन जण सलूनमधील कर्मचार्‍यांना कशा पद्धतीने मेकअप करावा याच्या सूचना करीत होते. त्यांच्याकडे विचारणा केली असता, या मुलांना आम्ही त्यांच्या अमेरिकेतील पालकांकडे पाठवत आहोत, असे उत्तर त्यांनी दिले होते. प्रीतीने त्या तिघांना पोलीस ठाण्यापर्यंत नेण्याची सूचना केली, मात्र त्यांनी नकार दिला. शेवटी पोलीस येईपर्यंत दोघांना थांबवण्यात प्रीतीला यश आले, मात्र तिसरा त्या दोन्ही मुलांना घेऊन पळून गेला होता.

पोलिसांनी त्यावेळी चार जणांना अटक केली होती. यात निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाचा समावेश होता. आमिर खान (26, पोलिसाचा मुलगा), ताजुद्दीन खान (48), अफझल शेख (35) आणि रिझवान छोटानी (39) अशी त्यांची नावे होती. गमलेवाला ज्या फोनवरील व्हॉट्सअ‍ॅपद्वारे या चौघांच्या संपर्कात होता, त्याचा तपास करून, गमलेवालाला जेरबंद करण्यात आले. गमलेवाला याला यापूर्वी 2007 साली बोगस पासपोर्टप्रकरणी  अटक करण्यात आली होती.